संवेदनशील व समाजाशी नाळ जुळलेला उद्योजक हरपला | बजाज समूहाचे माजी अध्यक्ष राहुल बजाज यांचे निधन

संवेदनशील व समाजाशी नाळ जुळलेला उद्योजक हरपला | बजाज समूहाचे माजी अध्यक्ष राहुल बजाज यांचे निधन

पुणे, ता १२ : देशातील आघाडीचा उद्योग समूह असलेल्या बजाज समूहाची धुरा तब्बल ४० वर्षे यशस्वीरित्या वाहणारे ज्येष्ठ उद्योगपती व बजाज समूहाचे माजी अध्यक्ष राहुल बजाज (वय ८३) यांचे आज पुण्यात निधन झालं. त्यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राहुल बजाज यांच्या निधनामुळे एक संवेदनशील व समाजाशी नाळ जुळलेला उद्योजक हरपला आहे.

नॉन कोविड न्यूमोनियामुळे त्रस्त असलेल्या राहुल बजाज (Rahul Bajaj) यांच्यावर मागील १५ दिवसांपासून रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू होते. न्यूमोनियामुळे त्यांचे फुफ्फुस हळूहळू निकामी होत गेले. त्यानंतर हृदयक्रियेवर परिणाम झाल. वृद्धापकाळामुळे त्यांचे शरीर उपचारांना साथ देत नव्हते. त्यामुळं त्यांची प्रकृती उत्तरोत्तर खालावत गेली आणि आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. बजाज समूहाने निवेदन प्रसिद्धीस देऊन त्यांच्या निधनाची माहिती दिली.

कोलकात्यातील एका उद्योजक कुटुंबात १० जून १९३८ रोजी राहुल बजाज यांचा जन्म झाला. वडील कमलनयन बजाज यांच्याकडून त्यांना उद्योगाचा वारसा मिळाला होता. राहुल बजाज यांनी अर्थशास्त्र आणि कायद्याची पदवी घेतली होती. हॉवर्ड विद्यापीठातून त्यांनी ‘एमबीए’चं शिक्षण पूर्ण केलं होतं. १९६५ साली राहुल बजाज यांनी आपल्या पारंपरिक उद्योगाची धुरा हाती घेतली. त्यांच्या नेतृत्वाखाली बजाज ऑटोने नेत्रदीपक प्रगती केली. कंपनीची उलाढाल ७.२ कोटींवरून तब्बल १२ हजार कोटींवर पोहोचली. त्यांच्याच कार्यकाळात बजाज कंपनीने दुचाकी विक्रीमध्ये देशातील आघाडीची कंपनी बनण्याचा मान मिळवला. तब्बल ४० वर्षे त्यांनी उद्योगाचे नेतृत्व केले. त्यानंतर २००५ साली त्यांनी आपले सुपुत्र राजीव बजाज यांच्याकडं कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची सूत्रे सोपवली. तोपर्यंत बजाज कंपनीने आंतरराष्ट्रीय बाजारातही आपले बस्तान बसवले होते.

उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी २००१ साली राहुल बजाज यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. २००६ ते २०१० या कालावधीत त्यांनी राज्यसभेचे सदस्य म्हणून काम पाहिलं होतं. रोखठोक स्वभाव असलेल्या बजाज यांचे सर्वच राजकीय नेत्यांशी सलोख्याचे संबंध होते.