विश्वनाथ गरुड
गेल्या काही वर्षांमध्ये माध्यमविश्वात नवीनच फॅड आले आहे. जो उठतो तो स्वतःची न्यूज वेबसाईट काढतो. सध्या देशात किती न्यूज वेबसाईट आहेत, याचा आकडा खुद्द केंद्र सरकारकडेही नाही. केंद्र सरकारने या न्यूज वेबसाईटचा अवकाश नेमका किती आहे, हे समजून घेण्यासाठी पाऊले उचलायला सुरुवात केली आहे. पण अजूनही नेमकेपणाने आकडा समोर आलेला नाही. वृत्तपत्र किंवा वृत्तवाहिन्या सुरू करण्यासाठी सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत विविध परवानग्या घ्याव्या लागतात. पण न्यूज वेबसाईट सुरू करायची असेल, तर कोणतीही परवानगी गरजेची नाही. मंत्रालयाने काही महिन्यांपूर्वीच जाहीर केलेल्या नियमांनुसार, न्यूज वेबसाईट सुरू केली की त्याची प्राथमिक माहिती मंत्रालयाकडे पाठविली पाहिजे. न्यूज वेबसाईटसाठी अजूनही वृत्तपत्र किंवा वृत्तवाहिन्यांप्रमाणे नोंदणी अनिवार्य नाही, असेही मंत्रालयानेच स्पष्ट केले. झाले असे की हजारो किंवा लाखो न्यूज वेबसाईट सध्या देशात तयार झाल्या आहेत. या वेबसाईटवरून रोज लाखो बातम्या प्रसारित होत आहेत आणि सोशल मीडियावरून त्या कोट्यवधी वाचकांपर्यंत पोहोचत आहेत. पण नीट बघायला गेलं तर कशाचा पायपोस कशात नाही. नुसताच सावळागोंधळ.
हे सगळं स्पष्टपणे मांडण्याची वेळ आली आहे. काही गैरसमज दूर झालेच पाहिजेत नाहीतर नुसतेच वाहावत जाऊ हे नक्की. पत्रकारिता करण्यासाठी न्यूज वेबसाईट काढणे अजिबात गरजेचे नाही. त्यामुळे तो गैरसमज पहिला दूर केला पाहिजे. त्यातही दिसते असे आहे की, महाविद्यालयांमधून आणि विद्यापीठांमधून पत्रकारितेचे औपचारिक शिक्षण पूर्ण केलेले काही विद्यार्थी लगेचच स्वतःची न्यूज वेबसाईट काढतात. मग त्यांचेच ३-४ मित्र या वेबसाईटसाठी ‘पार्टनर’ म्हणून काम करू लागतात. या सगळ्यांनाच नक्की पत्रकारिता काय असते, ती कशी केली पाहिजे, याबद्दल फारशी माहिती नसते. विद्यापीठातील औपचारिक शिक्षण आणि व्यावसायिक पत्रकारिता यामध्ये भले मोठे अंतर पडलेले आहे. जे पुस्तकी शिक्षण आपण घेतले ते प्रत्यक्ष काम करताना फार कमी उपयोगी पडते, याची जाणीव अशा नवोन्मुख पत्रकारांना कमी असते. एकीकडे ही स्थिती असताना दुसरीकडे ज्या वेबसाईटच्या माध्यमातून आपण पत्रकारिता करणार आहोत, त्याबद्दलची तांत्रिक, आर्थिक माहितीही नसते. मित्राने, भावाने, बहिणीने, ओळखीतल्याने वेबसाईट तयार करून दिलेली असते. अशी वेबसाईट आपल्याला आणि आपल्या पत्रकारितेला दीर्घकाळपर्यंत तग धरण्यासाठी उपयोगी आहे का, वेबसाईट कशी असली पाहिजे याचे जे तांत्रिक निकष आहेत, ते इथे पाळले गेले आहेत का, याचा थांगपत्ता यांना नसतो.
वेबसाईट काढल्यावर काहीजण गुगल ॲडसेन्सच्या माध्यमातून पैसे मिळतील, अशा स्वप्नात असतात. पण गुगल ॲडसेन्सच्या माध्यमातून मिळणारे पैसे कसे आणि किती मिळतात, ते उत्पन्न वाढविण्यासाठी काय केले पाहिजे, बिडिंग प्रोसेस काय असते याबद्दल ओ की ठो या नव्या पत्रकारांना माहिती नसते. त्यामुळे या वेबसाईटचे पुढे काय होणार हे ठरलेले असते.
दुसरे म्हणजे पत्रकारिता म्हणून आपण जे वाचकांपर्यंत घेऊन जाणार आहोत, ती माहिती आणणार कुठून याबद्दलही नेमकी माहिती अशा पत्रकारांकडे नसते. ३-४ मित्र मिळून एक वेबसाईट काढायची आणि त्यामध्ये देश-विदेश, महाराष्ट्र असे भलेमोठे सेक्शन ठेवायचे. एवढ्या भल्यामोठ्या भौगोलिक प्रदेशाचे वार्तांकन करणार कसे, असा प्रश्न विचारल्यावर इकडून किंवा तिकडून बातम्या उचलणार अशी उत्तरे दिली जातात, म्हणजे एक प्रकारचे वाड्मयचौर्यच. कारण आपल्याला बातम्या हव्या असतील तर आपले प्रतिनिधी तिथे असले पाहिजेत किंवा एखाद्या वृत्तसंस्थेचे सदस्यत्व आपण घेतले पाहिजे. असे काहीच होत नाही. इकडून तिकडून ढापून बातम्या घेतल्या जातात. त्याच आपल्या वेबसाईटच्या नावावर खपवल्या जातात. आपण कुठलीच नितिमत्ता पाळायची नाही आणि लोकांना बातम्यांमधून नितिमत्ता शिकवायची, असला मामला. कोणीच याला पत्रकारिता म्हणणार नाही.
अशा नव्या विद्यार्थ्यांनी स्वतःची न्यूज वेबसाईट काढण्याआधी एखाद्या मोठ्या वेबसाईटच्या संपादकीय विभागात काम करायला पाहिजे. तिथे कशा पद्धतीने काम चालते, समजून घ्यायला पाहिजे. बातमीत नेमकेपणा कसा असला पाहिजे, ठराविक जागेमध्ये आशय देताना कशाला प्राधान्य दिले पाहिजे, हे वृत्तपत्रात काम करून समजून घ्यायला हवे. वृत्तवाहिन्यांमध्ये काम करून काही सेकंदांमध्ये केवळ दृश्य माध्यमातून विषय किती गंभीर आहे, हे दाखवायला शिकले पाहिजे. हे सगळं किमान १० ते १५ वर्षे केल्यानंतर मग स्वतःची न्यूज वेबसाईट काढायची असेल तर एकवेळ समजू शकतो. कारण पत्रकारितेतील दशकाचा अनुभव तुमच्या पाठीशी असतो. त्यामुळे या क्षेत्रात काय आव्हाने आहेत, कशा अडचणी येतात, वाचक कशा पद्धतीने रिॲक्ट होतात हे तुम्हाला समजलेले असते.
पत्रकारिता शिकून नव्याने या क्षेत्रात येणाऱ्यांना याची काहीच कल्पना नसते. अनेकांना तर बातमी कशी लिहायचे हेच नीटपणे समजलेले नसते. अशा वेळी स्वतःची न्यूज वेबसाईट सुरू करणे हे धाडसाचे आहेच पण अत्यंत चुकीचेही. डिजिटल माध्यमे नव्याने आली आहेत पण पत्रकारिता जुनी आहे. वाचकांचा पत्रकारितेवर विश्वास आहे. सोशल मीडियात हजारो क्रिएटर्स असले, तरी पत्रकारितेत असलेल्या जुन्या ब्रँड्सला वाचक अधिक महत्त्व देतात. या ब्रँड्सने माहिती दिली म्हणजे ती खरीच असणार, यावर वाचकांचे एकमत होते. पण नव्या न्यूज वेबसाईटवर वाचक फारसा विश्वास ठेवत नाही. त्यातील आशय खूप गंभीरपणे घेतही नाहीत. विश्वास एका दिवसात किंवा एका वर्षात तयार होत नाही. त्यासाठी अनेक वर्षे कष्ट घ्यावे लागतात. न्यूज वेबसाईट काढून एका दिवसात आपली बातमी व्हायरल होईल आणि दुसऱ्या दिवशी आपण एकदम ‘मीडिया किंग’ होऊ हे केवळ स्वप्नरंजनच आहे. असे कधीच होत नाही आणि होणारही नाही.
तंत्रज्ञानामुळे डिजिटल माध्यमे माहिती वेगाने लोकांपर्यंत घेऊन जाताहेत. पण म्हणून प्रत्येकाने न्यूज वेबसाईट काढली पाहिजे असे मुळीच नाही. आपण चांगले पत्रकार आहोत म्हणजे आपल्याला न्यूज वेबसाईट काढून ती व्यवस्थितपणे चालविता येईल, असे समजण्याचेही कारण नाही. कारण न्यूज वेबसाईट चालविणे हा गुंतागुंतीचा आणि क्लिष्ट विषय आहे. वेबसाईटमधून अर्थार्जन कसे होईल हे समजेपर्यंत काही वर्षे जातात. गेल्या काही वर्षात जशा अनेक न्यूज वेबसाईट सुरू झाल्या आहेत, तशाच अनेक वेबसाईट बंदही पडल्या आहेत.
मागे एकदा एका मित्राने सांगितले होते की, यशस्वी लोकांचे चरित्र वाचण्यापेक्षा अपयशी लोकांकडून त्यांना अपयश का आले समजून घेतले पाहिजे. त्यातून जास्त शिकायला मिळते.