काळेवाडीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणीची मागणी

काळेवाडीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणीची मागणी

लोकमराठी न्यूज नेटवर्क

पिंपरी : काळेवाडीतील एमएम महाविद्यालयालगतच्या छत्रपती चौकात महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारण्यात यावा. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शेख इरफान अब्दुल रहीम यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

याबाबत शेख यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारत देशाने आपल्या हृदयात अनेक वीर पुत्राची यशोगाथा कित्येक शतकापासून जतन केलेली आहे. हे वीर पुत्र आपल्या पावन भूमीत जन्माला आले, हे आपले केवढे सौभाग्यच.

या महान विभुतींच्या वीरगाथा ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात, आणि त्यांच्या काळात आपण जन्माला आलो असतो. तर त्यांचे कर्तृत्व डोळ्यांनी पाहता आले असते. असे विचार मनाला स्पर्शून जातात.

आपल्या महाराष्ट्रात असाच एक शक्तिशाली, निष्ठावान, पराक्रमी राजा होवून गेला. अखंड भारतवर्षांत आपल्या कर्तृत्वाचा व पराक्रमाचा ठसा उठवत समाजातील प्रत्येक घटकाला समानतेची वागणूक दिली. अशा महान पराक्रमी, महाराजाधिराज छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास मानव जीवन असेपर्यंत प्रत्येकाच्या हृदयात जीवंत राहणार आहे. त्यांच्या पराक्रमाने इतिहास घडवला आणि त्यांचे नाव पानापानावर सुवर्ण अक्षराने कोरले गेले आहे.

या महान राजाचा पुतळा उभारण्याची तमाम रहिवाशांची तीव्र इच्छा आहे. त्यामुळे सर्व शासकीय कार्यात आपण सहकार्य करून यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून द्यावा. असे आम्ही सर्व नागरिकांकडून आपणास विनंती असून आपण सकारात्मक भूमिका घेत हा पुतळा लवकरात लवकर उभारून काळेवाडीकरांना भेट द्यावी. असे निवेदनात नमुद केले आहे.

दरम्यान, अशी आग्रहाची मागणी शेख इरफान अब्दुल रहीम यांच्यासह माजी नगरसेवक प्रकाश मल्लशेट्टी, शरद राणे, श्रीकांत पारखी, अनिल हतांकर, माजी सैनिक राजेश जाधव, रवींद्र राहते, अनिल सोनावणे, विशाल हनुमंत इत्यादींनी केली आहे.