धनंजय मुंडेंवर आता दुहेरी जबाबदारी! बीडसह ना. मुंडे आता परभणीचेही पालकमंत्री!

धनंजय मुंडेंवर आता दुहेरी जबाबदारी! बीडसह ना. मुंडे आता परभणीचेही पालकमंत्री!
  • बीड जिल्ह्यासह परभणी जिल्ह्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार – धनंजय मुंडे

मुंबई (प्रतिनिधी) – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणखी एक जबाबदारी दिली असून, त्यांना परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्त करण्यात आले आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांना ही माहिती दिली होती, त्यानंतर आज या बाबतचा शासनादेश निर्गमित करण्यात आला आहे.

राज्यभरात वक्तृत्व आणि कर्तृत्वातून वेगळा नावलौकिक प्रस्थापित केलेले नेते म्हणून धनंजय मुंडे यांची वेगळी ओळख आहे, त्याचबरोबर राज्यभरात त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बीड जिल्ह्याला लागून असलेल्या परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची सूत्रे ना. मुंडेंकडे सोपवल्याने निश्चितच धनंजय मुंडे यांची ताकद आणखी वाढणार आहे, शिवाय त्यांनाही आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची ही मोठी संधी मानली जात आहे.

दरम्यान धनंजय मुंडे यांनी परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची सूत्रे सोपवल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार, मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, प्रांताध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना जयंतराव पाटील तसेच महाविकास आघाडीचे आभार मानले आहेत.

आपल्यावर सोपवलेल्या या जबाबदारीच्या माध्यमातून बीड सह परभणी जिल्ह्यातही सकारात्मक विकास घडवून आणणारी कामे करून ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू व आपल्यावर पक्षश्रेष्ठींसह सर्वांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू, असे मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.

बीड जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून काम करत असताना धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यात बंद पडलेला पीकविमा पुन्हा सुरू केला, मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीच्या काळात धनंजय मुंडे यांनी राज्यात सर्वाधिक निधी व पीकविमा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पदरात पाडून घेतला.

कोविड काळात स्वतः दोन वेळा बाधित होऊनही धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यातील नागरिकांना आधार व मदत केली, पहिल्या लाटेतील दीड लाख ऊसतोड कामगारांचे यशस्वी स्थलांतर तर आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजले, आर्थिक दुर्बल घटकांना घरपोच किराणा, मागेल त्याला मोफत रेमडिसिव्हीर सारखी औषधी, 24 तास कार्यरत मदत कक्ष, सेवाधर्म यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांनी हजारो कुटुंबांना आधार दिला.

बीड जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून शेकडो कोटी रुपयांचा निधी, सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत विविध प्रशासकीय इमारतींच्या कामांना वेग, 1050 किलोमीटर पांदण रस्ते, 1 हजार पेक्षा अधिक गावांमध्ये नळाने पाणीपुरवठा योजना यासारख्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करत धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यात आपल्या कार्याचा ठसा उमटवला.

धनंजय मुंडे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अढळ स्थान, पक्ष वाढीमध्ये राज्यभर दिलेले योगदान, विरोधीपक्ष नेता म्हणून गाजवलेली कारकीर्द यांसह वरिष्ठ नेत्यांशी असलेले घनिष्ठ संबंध आदी जमेच्या बाजू कायम राहिलेल्या आहेत. आज धनंजय मुंडे यांच्यावर पक्ष नेतृत्वाने परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दिल्याने या सर्वच बाबींवर आज शिक्कामोर्तब झाले आहे.

परभणी करांकडून स्वागत

दरम्यान ना धनंजय मुंडे यांची परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्यानंतर परभणीतील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करत ना मुंडेंचे स्वागत केले आहे. आमदार बाबजाणी दुर्रानी, मा. आ. विजय भांबळे, राजेश दादा विटेकर आदींनी ना. मुंडेंची भेट घेऊन सत्कार केला तसेच जिल्ह्याच्या विकासाच्या बाबतीत एकत्र येऊन काम करण्याचा शब्दही दिला आहे.