पुणे रेल्वेकडून ३२ हजारांहून अधिक अन्न पाकिटांचे गरजूंना वाटप

पुणे रेल्वेकडून ३२ हजारांहून अधिक अन्न पाकिटांचे गरजूंना वाटप

पुणे (लोकमराठी) : करोना विषाणू संसर्गामुळे लागू असलेल्या टाळेबंदीच्या कालावधीत गरजवंतांना अन्नाची पाकिटे देण्यासाठी पुण रेल्वेकडून विविध पातळ्यांवर काम करण्यात येत आहे. आजवर पुणे शहरात ३२ हजारांहून अधिक अन्न पाकिटांचे वितरण करण्यात आले आहे. इंडियन रेल्वे केअटिरग अ‍ॅण्ड टुरिझम कार्पोरेशनसह (आयआरसीटीसी) अधिकारी आणि कर्मचारी व्यक्तिगत तापळीवरही यासाठी सहभाग देत आहेत.

राज्यात टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर २२ मार्चपासून रेल्वेकडून अन्न वाटपाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी आरआरटीसीकडून पुढाकार घेण्यात आला आहे. स्वयंपाकासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची व्यवस्थाही करण्यात आली आहे. यासह रेल्वे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सहकार्याने पुण्यातील विविध भागांमध्ये ३२ हजारांहून अधिक अन्न पाकिटांचे वाटप करण्यात आले आहे. त्याशिवाय शिवाजीनगर, हडपसर, देहूरोड, मिरज, कोल्हापूर, सातारा आदी स्थानके आणि जवळच्या परिसरातही अन्न वाटप करण्यात येत आहे. पुलाव, दाळ खिचडी, फळे, बिस्कीट, बाटलीबंद पाणी, पिठ, दाळ, तांदूळ आदी वस्तूंचेही वाटप गरजूंना करण्यात येत आहे.

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक सहभागातून पुलावची ४०० पाकिटे, पाण्याच्या ३०० बाटल्या, २०० साबण आदी वस्तूंचे वितरण पुणे स्थानक, विश्रांतवाडी, येरवडा आदी भागात करण्यात आले. त्याचप्रमाणे मिरज येथील माहेस विश्वदीप आश्रम येथे रेल्वेकडून अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. अन्न वितरण करताना मास्क आणि हातमोजे आदींचा वापर करून योग्य दक्षता घेतली जात असल्याचेही रेल्वेकडून सांगण्यात आले. रेल्वे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक सहभागाबाबत पुणे रेल्वेच्या व्यवस्थापक रेणू शर्मा तसेच सहर्ष बाजपेई, नीलम चंद्रा आदी अधिकाऱ्यांनी संबंधितांचे आभार व्यक्त केले.