पिंपरी : सप्तर्षी फाउंडेशन प्रकल्प कार्यालय रहाटणी येथे दिव्यांग बांधवांची विविध कागदपत्रे काढण्यासाठी होणारी गैरसोय कमी व्हावी व त्यांना आवश्यक दाखले व कागदपत्रे तसेच दिव्यांगांसंबधीत असणाऱ्या शासकीय व इतर योजनांची माहिती व लाभ एकाच छताखाली मिळावा याकरिता या शिबिराचे आयोजन करण्यात आले.
यामध्ये त्यांना दिव्यांग दाखले (युडीआयडी) मिळण्यासाठी नोंदणी, निरामय आरोग्य योजना अंतर्गत क्लेम /वैद्यकीय खर्चाचे कागदपत्राची स्वीकृती, रेल्वे सवलत नोंदणी, शासकीय शिष्यवृत्ती व अर्थसहाय्य, दिव्यांग मुलांचे व कुटुंबाचे टॅक्स सवलत व भविष्य आर्थिक नियोजन मार्गदर्शन इ. सुविधा देण्यात आल्या. या शिबिरास पिंपरी चिंचवड विभागातील जवळपास 65 दिव्यांग बांधवानी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तसेच सप्तर्षी फाउंडेशन सोबत दिव्यांग व्यक्तींच्या पालकांनी सुद्धा स्वयंसेवक म्हणून या कार्यासाठी आपली सेवा दिली.
या शिबिराचे उद्घाटन स्विकृत सदस्य संदीप नखाते यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी रोहन भालेराव, अनुप यादव, सप्तर्षी फाउंडेशनचे संस्थापक सचिव मनोजकुमार बोरसे, रूशाली बोरसे, समीना काझी, शितल जाधव, श्रध्दा नगरे, जयश्री डांगे, उमेश देसाई, किरण जाधव, आदित्य हेंद्रे, साहील ठोंबरे तसेच पालक प्रतिनिधी व स्वयंसेवक म्हणून रविंद्र तोडकरी, देवकर, नायकोडी इत्यादी उपस्थित होते. सदर शिबिराच्या समारोपात उपस्थित लाभार्थी दिव्यांग बांधव तसेच त्यांचे पालक व स्थानिक रहिवाशांनी सप्तर्षी फाउंडेशन यांचे आभार व्यक्त केले.
मनोजकुमार बोरसे यांचे आवाहन
संस्था चालवत असलेले सदर उपक्रम हे माझ्या व्यक्तिगत उत्पन्नातील मोठा हिस्सा (५०% हून अधिक) तसेच संस्थेचे सभासद व हितचिंतकांकडून आलेली सहयोग राशी यावर चालत असून ,अनेक वर्षे काम केल्यानंतर जनसामान्य तसेच दिव्यांगांच्या आशा ,अपेक्षा व संख्या दिवसेंदिवस वृद्धिंगत होत असून वृद्धिंगत आशा ,अपेक्षा व संख्या सामाजिक प्रकल्पाच्या माध्यमातून अंमलात आणण्यासाठी व त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी आर्थिक मदत ,साधने व मनुष्यबळाची आवश्यकता असून समाजातील दानशूर व्यक्तींना ,उद्योजकांना व कंपन्यांना संस्थेला सहयोग करण्याचे आवाहन संस्थेचे संस्थापक सचिव श्री. मनोजकुमार बोरसे यांनी केले आहे. उत्पन्न कर कायद्यातील 80 ग तरतुदी अंतर्गत संस्थेला दान देणाऱ्या व्यक्तीस किंवा कंपनी कंपनीला उत्पन्न कर सवलत अनुज्ञेय आहे.
श्री. बोरसे म्हणाले संस्थेचे विविध संकल्प आणि प्रकल्प राबविण्यासाठी संस्थेच्या अध्यक्षा सौ.वैशालीताई मुळे,सचिव श्री. श्रीकांत चव्हाण व सदस्य वरून सावरे यांचे मार्गदर्शन वेळोवेळी प्राप्त होते.
संस्थेला नेहमीच सहकार्य करणाऱ्या सर्व हितचिंतक,सभासद व मार्गदर्शक तसेच शासकीय यंत्रणा (जिल्हा रुग्णालय,पिंपरी चिंचवड महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय,पोलीस प्रशासन,रेल्वे मंडळ,व आधार केंद्र इत्यादींचे श्री. बोरसे यांनी मनापासून आभार मानले.