भेसळयुक्त मद्यविक्रीस बळी पडू नका; राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आवाहन

भेसळयुक्त मद्यविक्रीस बळी पडू नका; राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आवाहन

मुंबई : नामांकित कंपन्यांच्या नावमुद्रेखाली उच्च प्रतीचे मद्य माफक दरात विक्रीच्या नावाखाली बनावट मद्याच्या प्रलोभनाला बळी पडू नये, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी केले आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने बनावट मद्यविक्रीचे अनेक गुन्हे उघडकीस आणले असून दोषीवर कठोर कारवाई केली आहे. नाताळ व नववर्ष प्रारंभाच्या कालावधीत बऱ्याचदा माफक दरात उच्च प्रतीचे मद्य (स्कॉच) ‘डयुटी फ्री स्कॉच’ च्या नावाने बनावट व भेसळयुक्त मद्यविक्रीचे प्रकार झाले आहेत. अशा विक्रीपासून सावध राहण्याचे आवाहन उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.

अशा गुन्ह्यांमध्ये बनावट व भेसळयुक्त मद्यविक्रीतून ग्राहकांची आर्थिक फसवणूक होते. त्याचबरोबर अशा मद्यसेवनाने आरोग्यावर देखील विपरित परिणाम होऊ शकतो.

भेसळयुक्त व बनावट मद्य विक्रीची माहिती असल्यास व तक्रार नोंदविण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा १८००८३३३३३३ हा टोल फ्री क्र. आणि ८४२२००११३३ या व्हॉटसॲप क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.