प्रश्न विचारल्याशिवाय वैयक्तिक आणि समाज जीवनातील समस्या सुटणार नाहीत : प्रा. डॉ. राजेंद्र कांकरिया

प्रश्न विचारल्याशिवाय वैयक्तिक आणि समाज जीवनातील समस्या सुटणार नाहीत : प्रा. डॉ. राजेंद्र कांकरिया
  • ‘वुई टूगेदर फाउंडेशन’ आयोजित कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात प्रतिपादन

पिंपरी चिंचवड : सामाजिक कार्यकर्त्यांनी आधी स्वतःसाठी जगले पाहिजे,स्वतःच्या क्षमता आणि महत्व ओळखायला हव्यात.त्यासाठी सतत प्रश्न विचारले पाहिजेत,त्यामुळे जीवनातील समस्यांचे निवारण होईल.स्वतःबद्दल अहंकार व फुशारकी नको,नम्रता आणि ऐकून घ्यायची सवय ठेवावी,तसेच वैज्ञानिक विवेकवादी विचार मंथनातून आणि छोट्या छोट्या प्रयोगातून समाज आणि राष्ट्राची सेवा करता येईल असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलसचिव, प्रतिभा शैक्षणिक संकुलाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी व करिअर मार्गदर्शक डॉ. राजेंद्र कांकरिया, यांनी केले. चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित ‘वुई टूगेदर फाउंडेशन’ कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गामध्ये ‘चला जग बदलूया,समाजासाठी काहीतरी करूया.’ या विषयावरील प्रशिक्षण वर्गात ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की,समाजातील उपेक्षितांचे आर्थिक,सामाजिक,शैक्षणिक सक्षमीकरण करण्यासाठी विशिष्ट प्रकल्प राबवणाऱ्या हजारो एनजीओ या देशांमध्ये काम करत आहेत.त्यातील कार्यकर्त्यांनी व्यक्तिगत,कौटुंबिक,समाज,देश आणि संपूर्ण विश्व पातळीवर छोट्या, छोट्या कामातून स्वतःच्या आयुष्यातील काही वेळ समाजासाठी दिला आहे.आपण हे समजून घेतले पाहिजे की जगात एक गोष्ट निश्चित असते ती म्हणजे बदल! हा बदल दररोज होत असतो.स्वतःच्या व्यक्तिगत आयुष्यात स्वतःला काही प्रश्न विचारल्याशिवाय स्वतःच्या क्षमता कळणार नाहीत.

सामाजिक,सेवाभावी कामातून संवेदनशील कार्यकर्ते विविध क्षेत्रात सामान्य लोकांच्या उपेक्षित आयुष्यात बदल घडवण्यासाठी धडपड करत असतात.त्यांचा त्याग विशिष्ट ध्येय ठरवून निश्चित झालेला असतो.असे प्रशिक्षित कार्यकर्ते संस्थात्मक कामातून समाजासाठी काही तरी करून समाज बदलाच्या प्रक्रियेमध्ये आघाडीवर असतात.यासाठी ज्याला गरज आहे अशा उपेक्षित समाजघटकाची निवड केली पाहिजे. 30 सप्टेंबर 1993 रोजी किल्लारी भूकंपात आम्ही अनाथ झालेल्या मुलांचे आयुष्य उभे करण्यासाठी भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून 1200 मुलांची शाळा पिंपरी येथे स्थापन केली,1000 मुलांसाठी कॅन्टीन, वसतिगृह,महाविद्यालय सुरू केले.राज्यसरकार,जागतिक बँक,सेवाभावी व्यक्ती आणि संस्थामार्फत भूकंपग्रस्त अनाथ मुलांच्या सबलीकरणाची समस्या निवारण करणारा प्रकल्प यशस्वी केला आहे.पुनर्वसन,सेवाभावी प्रकल्पांचा आराखडा तयार करा,असे डॉ.राजेंद्र कांकरिया यांनी सांगितले.

‘वुई टूगेदर फाउंडेशन’ या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी नेमकी गरज ओळखून छोटे प्रकल्प तयार करावेत,त्यासाठी प्रशिक्षित तरुण तरुणीची टीम स्वतःचा वेळ देऊ शकते.असे प्रा.डॉ.राजेंद्र कांकरिया यांनी ‘वुई टूगेदर फाउंडेशन’ आयोजित कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गामध्ये सांगितले. या कार्यक्रमाचे उदघाटन प्रा.डॉ.राजेंद्र कांकरिया, प्रमुख पाहुणे डॉ.किशोर खिल्लारे,कॉम्रेड सचिन कांबळे,योगेंद्र भगत,सलीम सय्यद,प्रा.डॉ.मेघना भोसले यांनी दीप प्रज्वलन करून केले.

कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे अध्यक्ष कार्टुनिस्ट योगेंद्र भगत म्हणाले की, या अभ्यास वर्गातून कार्यकर्त्यांचे बुद्धिमान नेतृत्व विकसित होईल,उपेक्षितांच्या आशा आकांक्षा परिपूर्ण करणारे नाविन्यपूर्ण प्रकल्प संस्था विकसित करेल असे मला वाटते.

प्रमुख पाहुणे जनआरोग्य मंच,पुणेचे अध्यक्ष,शहरी आरोग्य अभ्यासक डॉ.किशोर खिल्लारे यांनी सांगितले की, आपल्या देशात आर्थिक समृद्धीच्या क्षेत्रात प्रचंड मोठी प्रगती झाली आहे,परंतु देशातील मानवी विकास निर्देशांक,आरोग्य सेवा,दारिद्र्य यामध्ये आपला नंबर जगात पहिल्या 100 देशामध्ये नाही,इतकी आर्थिक सामाजिक विषमता आहे.कारण या देशात उपेक्षित लोकांची संख्या का वाढत आहे.आणि त्यांच्या समस्या कशा निर्मूलन होतील याचा अभ्यास सर्वांनी करावा,आरोग्य क्षेत्रात शासनाच्या अनेक जन आरोग्याच्या योजना सामान्य लोकांना मिळवून देण्यासाठी काही निवडक आरोग्य चिकीत्सा शिबिराचे कार्यक्रम वंचितांच्या वस्तीत राबवावेत.त्यासाठी मदत करू.

कॉम्रेड सचिन कांबळे,एम टी एस एस डी वर्कर्स युनियन,खडकी म्हणाले की, आम्ही गेली अनेक वर्षे कामगार चळवळीत काम करत आहोत,ग्रामीण,दुर्गम भागातील कुपोषणाच्या समस्यांचा निपटारा करण्यासाठी संस्थेला आम्ही सर्वप्रकारची मदत देऊ,असे आश्वासन दिले.

श्रीनिवास जोशी,अभिजित तांबे,सदाशिव गुरव,दिलीप पोरे,सुवर्णा पोरे,सचिन कांबळे,किरण ननावर मोहन कामठे,अरविंद,पाटील,विलास जगताप, जगताप,तारा बोऱ्हाडे,ऋतुजा बोऱ्हाडे,मनीषा सकपाळे, कविता मंदोधरे,रुपाली भस्मे,एम के शेख,अर्चना ढाणके,चंद्रकांत गायकवाड,सुदाम घोलप,राजेंद्र महाले,सुनील चव्हाण,अर्चना पवार,अर्चना गायकवाड,संध्या खामकर आदी 50 कार्यकर्ते शिबिरास उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन सलीम सय्यद,दिलीप पेटकर,शैलजा कडुलकर,शेहेनाज शेख,सोनाली शिंदे, भावीन भंडारी,स्वप्निल जेवळे,किशोर कुमावत यांनी केले. प्रास्ताविक सोनाली मन्हास,सूत्रसंचालन श्रीनिवास कुळकर्णी, आभारप्रदर्शन प्रा. मेघना भोसले यांनी केले.