धर्म आणि धर्मग्रंथांनी पूर्वीच्या काळी खूप महत्वाचे काम बजावले आहे.. समाजव्यवस्था कशी असावी? दुसऱ्याला त्रास न होता कसे वागावे? न्यायनिवडा कसा करावा? नीतीने वागणे म्हणजे काय? खरं खोटं म्हणजे काय? चांगलं वाईट कसं ठरवायचं? असे नैतिक प्रश्न त्याकाळी धर्म सोडवत असे…
तेंव्हाच्या उपलब्धतेनुसार आणि निसर्गानुसार पेहराव कसा असावा, स्त्री-पुरुषांनी काय घालावे, याचेही नियम धर्मच बनवत होता. पूर्वीचे वैद्यकशास्त्र आता ईतके प्रगत नव्हते म्हणून आजार होऊ नयेत यासाठी कोणत्या मोसमात काय खावे काय प्यावे याचेही मार्गदर्शन धर्मच करत असे.. वाळवंटात पाणी जपून वापरावे लागते म्हणून फक्त आठवड्यातून एकदा अंघोळ, वाळूच्या वादळकणांपासून संरक्षण म्हणून चेहरा अन डोके झाकून घेण्याची पध्दत, अशा छोट्या छोट्या गोष्टीत देखील धर्मच मार्गदर्शन करत होता. पूर्वी सतत होत असलेल्या युद्धांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात तरुण पुरुष मृत्युमुखी पडत म्हणून लोकसंख्या टिकविण्यासाठी बहुपत्नीत्वाची पद्धत जवळजवळ सर्वच धर्मात होती. त्याकाळी जी काही माहिती उपलब्ध होती किंवा प्रचलित समजुती होत्या त्यावरच आधारित प्रेषितांनी धर्मग्रंथ लिहिले. त्या त्या परिस्थितीत सर्वांना योग्य पध्दतीने, आणि दीर्घायुषी कसे जगता येईल हेच त्या प्रेषितांनी, धर्मगुरूंनी आणि धर्मग्रंथांनी पाहिले..
खरंतर प्रत्येक प्रदेशात उगम पावलेला धर्म म्हणजे त्यावेळची तिथली जगण्याची रीत होती..
याही पुढे जाऊन धर्माने पाऊस कसा पडतो?, विजा का चमकतात? दिवस आणि रात्र का होतात? ग्रहणे का लागतात? अशा वैज्ञानिक प्रश्नांची उत्तरे देखील दिली.. प्रत्येक धर्मग्रंथानी माणसाच्या बौद्धिक भुकेला त्या त्या काळच्या उपलब्ध ज्ञानानुसार आणि प्रचलित समजुतींनुसार यथाशक्ती उत्तरे दिली आणि माणसाची जिज्ञासा शमवली.. शांतीने जगता यावे यासाठी मनोविकासाच्या पातळीवर देखील मार्गदर्शन केले..
त्याबद्दल धर्माचे खूप खूप आभार..
पण नंतर नंतर जसे जसे नवे नवे शोध लागत गेले आणि विज्ञान प्रगत होत गेले.. गणित प्रगत होत गेले.. भौतिक, जीव, रसायन यांची शास्त्रे उदयास आली तसतसे वरच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ‘सायन्स’ देऊ लागले.. आताच्या आधुनिक जगातल्या बदललेल्या समस्यांची उत्तरे ‘समाजशास्त्र’ चांगल्या रीतीने देऊ लागले. मानसशास्त्र आणि मनोविकार शास्त्रांनी तर माणसाच्या स्वतःसोबतच इतरांबद्दल देखील विचार करण्याच्या प्रक्रियेमध्ये आमूलाग्र बदल केले.
आता अशी द्विधा परिस्थिती आहे की हे धर्म, धर्मग्रंथ, कुराण पुराणे ज्यात असणारी उत्तरे आजचे विज्ञानयुग तोकडी अथवा खोटी ठरवित आहे..आणि दुसरीकडे, माणसाने कसे वागावे? काय खावे प्यावे याबाबद्दलचे हजारो वर्षांपूर्वीच्या काळातल्या धर्मग्रंथातले नियम आहेत, जे आजच्या काळात माणूस तंतोतंत पाळूच शकत नाही.
आता ना धड बदलत्या काळानुसार आपले धर्मग्रंथ अपडेट करून घ्यायची सोय आहे, ना कोणी सुज्ञ धर्मग्रंथांवर डोळे उघडे ठेवून विश्वास ठेऊ शकतोय.. अशी आपली गोची झालेली आहे..
आज पुराण कुराण आणि बायबल मधल्या आज्ञांचे पालन करणे जवळजवळ अशक्य आहे. फक्त आपल्या टोकदार अस्मितांमुळे आपण ते उघडपणे कबूल करत नाही, इतकेच..
‘जग कुठून आलं’? विश्वाच्या केंद्रस्थानी काय आहे? आणि यासारख्या अनेक प्रश्नाचं उत्तर सापडत नाही म्हणून ‘अज्ञात शक्ती’, वगैरे प्रकार सुरु होतात. कारण आपल्याला प्रश्न तसेच अनुत्तरीत ठेवता येत नाहीत. तेवढे ‘पेशन्स’ नसतात. आपल्याला प्रश्न तसेच अनुत्तरीत ठेवता यायला हवेत. कारण काही प्रश्नांची उत्तरं ही काळानेच सापडतात. विज्ञान ते शोधते आहे.. आपल्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तर आज सापडत नाही, म्हणून त्याला शॉर्टकट शोधणं योग्य नाही. २०० वर्षापूर्वी जे प्रश्न अनुत्तरीत होते, ते आज आपण संदर्भासहित दाखवू शकतो, सिद्ध करू शकतो. आज आपण बिगबँग पर्यंत पोहोचलोय, कदाचित शंभर-हजार वर्षांनी, आपल्याला आज न मिळालेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं सापडतीलही. पण प्रश्नांची उत्तरं सापडत नाहीत, म्हणून आपण लगेच हार मानून पुराणकालीन पुस्तकातल्या गोष्टीवर विश्वास ठेवायला हवा का ? हा माझा प्रश्न आहे.. विज्ञान म्हणजे केवळ प्रयोगशाळा किंवा केमिकल रिऍक्शन वगैरे एवढेच नसून ‘विज्ञान म्हणजे सर्वसामान्य लोकांची ‘विचार’ करण्याची तर्कशुद्ध पद्धत आहे..’
सायन्सबद्दल एक गोष्ट चांगली आहे ती म्हणजे, प्रयोगांतून मिळणारी उत्तरे आणि शोधांतून मिळणारे एव्हीडन्सेस यातून ते सतत अपडेट होत राहते, बदल स्वीकारत राहते.. म्हणून विज्ञान कधीही अंतिम सत्य गवसल्याचा दावा करत नाही.. विज्ञानापुढं तुमच्या कोमल भावनांना किंवा टोकदार अस्मितांना स्थान नसते. असो..
आता उत्क्रांतीच्याच “सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट” नियमानुसार धर्माची जागा जास्त प्रगत असणारं सायन्स घेत आहे, आणि घेणार आहे.. आपल्या जगण्यातली उत्तरं आता ते देणार आहे.. त्यात धर्म आणि सायन्स यांना एकमेकांचे दुश्मन वगैरे मानण्याचा प्रकार आपण करू नये.
उत्क्रांतीची थियरी मांडणाऱ्या चार्ल्स डार्विनचा आज वाढदिवस आहे. उत्क्रांती जशी प्राणी अन वनस्पतींची होत असते, तसंच उत्क्रांती ही विचारांची, संस्कृतींची, अन समाजशास्त्राची देखील होत असते.
मानवी उत्क्रांतीतला ‘धर्म’ हा केवळ एक टप्पा होता, जो आता मागे पडत आहे, पडणारही आहे.. तो टप्पा आपल्याला एकदम सोडून जरी नाही देता आला, तरी किमान त्यातील कट्टरता आपण नक्कीच कमी करू शकतो..
थोडक्यात सांगायचं म्हणजे, तो टप्पा जेवढा लवकर आपण स्वतःहून सोडून देऊ तेवढा रक्तपात कमी होईल इतकेच..!
– डॉ सचिन लांडगे, भुलतज्ञ, अहमदनगर.