कोणताही चित्रपट किंवा नाटक यशस्वी होते, तेव्हा त्यामध्ये पडद्यामागील कलाकारांची देखील महत्त्वाची भूमिका समजली जाते. इतर क्षेत्रांतही असेच कलाकार असतात, ते आपले दिलेले काम करीत असताना इतरही वेगळे कामे करीत असतात. याचे एक उदाहरण म्हणजे डॉ.तुषार निकाळजे.
डॉ. तुषार निकाळजे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात वर्ष 1991 ते आज पर्यंत गेली तीस वर्षे क्लार्क पदावर काम करीत आहेत .त्यांनी कार्यालयीन काम करीत असतानाच एम. कॉम ,एम .फिल ,पीएच.डी.शिक्षण व संशोधन पूर्ण केले आहे. तसेच त्यांनी पोस्ट डॉक्टरल रिसर्च करिता विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांचेकडे प्रस्ताव सादर केला आहे.
डॉ.तुषार निकाळजे यांनी आज पर्यंत दहा पुस्तके लिहिली व प्रकाशित केली आहेत.
त्यांनी लिहिलेले “भारतीय निवडणूक प्रणाली ,स्थित्यंतरे व आव्हाने” हे पुस्तक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ- नांदेड ,कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ -जळगाव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ -पुणे या विद्यापीठांच्या बी.ए व एम. ए. अभ्यासक्रमांना संदर्भ पुस्तक म्हणून अभ्यास मंडळांनी मान्यता दिली आहे .या पुस्तकाचा उपयोग किमान सहा लाख विद्यार्थ्यांना होत आहे. तसेच हे पुस्तक स्पर्धा परीक्षा, प्रशासकीय अधिकारी ,सामाजिक कार्यकर्ते ,पत्रकार, संशोधक यांनादेखील उपयुक्त आहे. या पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती ‘इंडियन एलेक्शन सिस्टीम “प्रकाशित केली आहे.
यानंतर “लाल फितीतील कागदी घोडे” हे पुस्तक प्रकाशित केले. सर्वसामान्यांना गल्ली ते दिल्ली पर्यंत शासकीय स्तरावर यशस्विता कशी मिळेल ?यावर या पुस्तकात भाष्य केले आहे.
“पीएच.डी.चा फार्स” हे संशोधना संदर्भात टीकात्मक पुस्तकाचे लेखन डॉ. निकाळजे यांनी केले आहे.
कारकुनाच्या आयुष्यावर आधारित “वन बाय टू” ही कादंबरी प्रकाशित केली आहे.
विद्यापीठाच्या कामकाजाची प्रशासकीय माहिती असलेले “विद्यापीठ समजून घेताना” हे मराठी भाषेतील पुस्तक प्रकाशित केले आहे. या पुस्तकाची “अंडरस्टँडिंग द यूनिवर्सिटी” या ब्रेल लिपीतील पुस्तकाची निर्मिती दृष्टिहीन विद्यार्थ्यांकरीता केली आहे. त्यामुळे दृष्टिहीन विद्यार्थी यांना उपयोग होईल .सध्या या विषयाचे भारतीय व परकीय बहु भाषेत पुस्तक तयार करण्याचे काम चालू आहे.
याच बरोबर साप्ताहिक, दैनिक, वर्तमानपत्रे यामध्ये डॉ.निकाळजे यांचे विविध विषयांवरील २८ लेख प्रसिद्ध झाले आहेत. विद्यापीठ अनुदान आयोग ,नवी दिल्ली यांच्या मान्यताप्राप्त संशोधन पत्रिकेत ०९ लेख प्रकाशित झाले आहेत.
डॉ.निकाळजे यांच्या शैक्षणिक व संशोधनात्मक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने वर्ष २०१९ मध्ये “निष्णात व्यक्ती” म्हणून निवड केली आहे .डॉ.निकाळजे यांनी राज्य व आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये सहभाग घेतला आहे .याची शैक्षणिक व संशोधनात्मक कार्याची दखल घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने ठराव मंजूर करून विद्यापीठाच्या वेबसाईटवर “रिसर्च व पब्लिकेशन” पोर्टल मध्ये त्यांचा बायोडाटा प्रकाशित केला आहे. भारतातील विद्यापीठांच्या पोर्टलवर कर्मचाऱ्यांची माहिती असणारा हा पहिलाच प्रसंग आहे.
“फादर “या शॉर्ट फिल्मच्या निर्मितीमध्ये डॉ.निकाळजे यांचा सहभाग आहे. या शॉर्ट फिल्मला नुकतेच बंगाल व औरंगाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म फेस्टिवल मध्ये पुरस्कार मिळाला आहे.
करिअर मंत्र या लेखमालेत राज्यशास्त्र ,वाणिज्य व ग्रंथालयशास्त्र या विषयांबद्दल करिअरचा राजमार्ग लेख लिहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. डॉ.निकाळजे यांच्या या सर्व शिक्षण,संशोधनाची “इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड “मध्ये “स्पर्धात्मक कौशल्य असलेला शिक्षकेत्तर कर्मचारी” अशी नोंद झाली आहे.तसेच “वर्ल्ड रेकॉर्ड युनिव्हर्सिटी,लंडन” यांनी डॉ.निकाळजे यांना “मानद डॉक्टरेट” प्रदान केली आहे.यामुळे समस्त कारकूनांचा हा एक प्रकारे जागतिक सन्मानच मिळवून दिला आहे.
र्डॉ.तुषार निकाळजे यांनी सकाळी १०.२० ते सायंकाळी ६.०० नोकरी करून शैक्षणिक प्रगती करताना वेगवेगळ्या गोष्टींचा अवलंब केला .सायंकाळी ६.३० ते सकाळी १० या वेळेत लवचिकता ठेवली गेली. पस्तीस वर्षे दररोज किमान एक तास वाचन, लेखन, चर्चा या स्वरूपात अभ्यासाचा व्यायाम करीत आहेत.
“आयुष्यात कोणतीही प्राप्ती होण्यासाठी शास्त्रशुद्ध पाठपुरावा करणे आवश्यक आहे. शॉर्टकट नाही. स्पर्धा इतरांशी नाही तर स्वतःशी असली पाहिजे, त्यामुळे आपल्यातील गुणांची वृद्धी होते. याचा लाभ व्यक्तिगत न राहता कुटुंब, समाज, देश यांना प्रत्यक्षरित्या होतो.” – डॉ. तुषार निकाळजे
कोणतीही घटना घडल्यास तर्कशास्त्रातील वैचारिक सिद्धांतांचा वापर करून त्यावर उपाय योजना करता येते. आयुष्यात चौकटीबाहेर जाऊन काम करण्याचा आनंद हा वेगळाच असतो .या सर्व गोष्टी करताना घरची जबाबदारी सांभाळणे गरजेचे व महत्त्वाचे आहे. या सर्व शैक्षणिक गोष्टी डॉ. निकाळजे यांनी स्वखर्चाने केल्या आहेत. हा सर्व प्रवास करताना अडचणी येणारच. परंतु त्यावर मात करणे, मार्ग काढणे हाच उपाय असतो.
एखादा दरवाजा बंद झाला, तर न थांबता इतर मार्गांचा शोध घेतल्यास पाच दरवाजे खुले होत असतात,या तंत्रज्ञानाचा वापर डॉ. निकाळजे यांनी केला. निंदा, नालायकी, चेष्टा यांचा विचार केल्यास आपली प्रगती थांबते किंवा मंदावते, याकडे लक्ष न देता आपली वाटचाल चालू ठेवल्यास हमखास यश प्राप्तीची हमी असते.
या व्यक्ती परिचयाच्या निमित्ताने डॉ. तुषार निकाळजे या व्यवस्थेतील एका गुमनाम बादशहा किंवा पडद्यामागील कलाकाराची ओळख प्रकाशित करण्याचा हा एक प्रयत्न!