उद्योजकांनी जागतिक दर्जाचे उत्पादन निर्यात केल्याने उद्योग क्षेत्रात राज्य अग्रगण्य – उद्योगमंत्री सुभाष देसाई

उद्योजकांनी जागतिक दर्जाचे उत्पादन निर्यात केल्याने उद्योग क्षेत्रात राज्य अग्रगण्य – उद्योगमंत्री सुभाष देसाई

राज्यातील उद्योजकांनी जागतिक दर्जाचे उत्पादन निर्माण करुन ते निर्यात केले आणि जागतिक बाजारपेठ काबीज केल्याने महाराष्ट्र राज्य देशात उद्योगात प्रथम असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.

जागतिक व्यापार केंद्र येथे उद्योग विभागामार्फत आणि जागतिक व्यापार केंद्राच्या सहकार्याने आयोजित राज्यातील उत्कृष्ट निर्यातदारांना राज्य पुरस्कार प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उद्योग राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे, निर्यात आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे प्रवीण दराडे जागतिक व्यापार केंद्राच्या वरिष्ठ संचालक रूपा नाईक, विजय कलंत्री आदी उपस्थित होते.

उद्योग मंत्री श्री देसाई, राज्यमंत्री कु. तटकरे यांनी निर्यातीला चालना देणा-या एक्स्पोर्ट वेब पोर्टल (EXPORT WEB PORTAL)चे अनावरण केले. तसेच एक जिल्हा एक उत्पादन या पुस्तकाचे प्रकाशन केले.

राज्यातील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या 34 उद्दोजकांना त्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि गुणवत्ता प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

उद्योजकांनी जागतिक दर्जाचे उत्पादन निर्यात केल्याने उद्योग क्षेत्रात राज्य अग्रगण्य – उद्योगमंत्री सुभाष देसाई

श्री.देसाई म्हणाले, राज्यातील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या उद्योजकांच्या सन्मानामुळे महाराष्ट्रातील उद्योजक व नव उद्योजकांना प्रेरणा मिळून त्यांची कामगिरी अधिक उत्तुंग होण्यास मदत होईल. निती आयोगाने जाहीर केलेल्या एक्स्पोर्ट प्रिपरेशन इंडेक्स 2020 (Export Preparedness Index २०२०) मध्ये महाराष्ट्राला देशात दुसरा क्रमांक मिळाला आहे.

राज्यातील उद्योजकांची स्पर्धा ही शेजारील राज्याशी नसून जगाशी आहे. जपान, दक्षिण कोरीया असे छोटे देश आपले उत्पादन गुणवत्तापुर्ण तयार करु शकतात तर आपणही कमी नाही.

एक जिल्हा, एक उत्पादन (One District One Product): एक जिल्हा एक उत्पादन अंतर्गत जिल्हयांमधील निर्यात क्षमता असणारी एकूण १३६ कृषी व औद्योगिक उत्पादने निश्चित करण्यात आली असून, त्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून कार्यवाही करण्यात येत आहे.ही १३६ उत्पादने न राहता लवकरच १ हजार उत्पादनाचा टप्पा राज्यातील उद्दोजक गाठतील असे श्री. देसाई यांनी सांगितले.

उद्योग राज्यमंत्री कु.आदिती तटकरे म्हणाल्या,उद्योग, कृषि, वस्त्रोद्योग, वैद्यकीय, अभियांत्रिकी, रासायनिक, अन्न प्रक्रिया, रत्न व दागिने यांवर आधारित “वन डिस्ट्रीक्ट वन प्रॉडक्ट” अंतर्गत राज्यातील निरनिराळ्या दर्जेदार निर्यातींमध्ये 113 उत्पादनांचा समावेश आहे. राज्यस्तरीय कार्यशाळेत उद्योग जगतातील वैचारिक देवाण-घेवाण, निर्यातीमध्ये नाविन्यपूर्ण कल्पना एकत्रित सहभागातून मांडण्यासाठी राज्याच्या उद्योग विभागाने यानिमित्ताने एक हक्काचे व्यासपीठ निर्यातदारांसाठी येथे स्थापन केले आहे.

देशातील थेट विदेशी गुंतवणूकीमध्ये महाराष्ट्राचे स्थान अव्वल आहे.

कु. तटकरे म्हणाल्या,विविध क्षेत्रांतील सामंजस्य करार, प्लग ॲण्ड प्ले, वीजनिर्मिती, विमानतळे, वाहतूक व्यवस्था, विशेष आर्थिक क्षेत्रांची निर्मिती आदी माध्यमातून उद्योजक व निर्यातदार यांना सुविधा देण्यासाठी राज्य धोरणात्मक उपक्रम राबवित आहे. राज्यातील स्थानिक उत्पादने ही जागतिक बाजारपेठेमध्ये राज्यसह देशाचे मूल्यवर्धीत करण्यासाठी गेल्या दोन वर्षात महत्त्वाची भूमिका उद्योग विभाग बजावित असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.