एकनाथ शिंदे यांचा फोटो म्हणून फिरणारा बाबा कांबळे आहेत तरी कोण?

  • रिक्षा सोबत असलेल्या फोटो संदर्भात अजित पवार यांचा बाबा कांबळे यांना फोन

पिंपरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रिक्षा सोबतचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. मात्र, तो फोटो मुख्यमंत्री शिंदे यांचा नसून पिंपरीतील महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांचा असल्याचे समोर आले आहे. त्यासंदर्भात माजी उपमुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांना फोन करून ‘बाबा तो फोटो तुझाच आहे का?’ अशी विचारणा करत व्हायरल फोटो मागील सत्य जाणून घेतले.

रिक्षा चालक-मालक, घरेलू कामगार महिला, पथारी, हातगाडी, टपरीधारकांचे प्रश्न सोडविण्यासाठी रस्त्यावर संघर्ष करणारे नेतृत्व बाबा कांबळे यांचे आहे. उपोषण, मोर्चे, धरणे आंदोलन करत महापालिका प्रशासन, राज्य शासनाला धारेवर धरून अनेकांना न्याय देण्याचे काम त्यांनी केले आहे. पुढेही हे काम चालूच आहे. आपल्या कामातून लोकांच्या मनात उतरलेले बाबा कांबळे यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. बाबा कांबळे यांचा 1997 मधील एक फोटो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने व्हायरल झाला. त्यामुळे संपूर्ण नेटकऱ्यांमध्ये त्याची चर्चा सुरू झाली आहे.

बाबा कांबळे यांचा अल्प परिचय

बाबा कांबळे यांचा जन्म २ डिसेंबर १९७७ रोजी जालन्यातील घनसांगवी या तालुक्याच्या कुंभारे पिंपळगाव येथे झाला. आई, वडील आणि पाच भावंडं असे त्यांचे कुटुंब आहे. दोन बहिणी आणि दोन भाऊ. घरची परिस्थिती अत्यंत गरीबीची होती. त्यांची शेती वगैरे नव्हती. वडिलांचा बूट चप्पलचा व्यवसाय होता, त्यावर घर चालायचे. गावी असताना दुसरीपर्यंत त्यांचे शालेय शिक्षण झाले. तुटपुंज्या कमाईत घर खर्च भागत नव्हता. त्यामुळे हे कुटुंब पुण्यात आळंदीला रोजगारासाठी आले. येथे त्यांची आजी राहात असे. तिचे घर म्हणजे एक झोपडीच होती. त्यावेळी बाबांचे वय साधारणपणे १० वर्षांच्या आसपास होते. आईवडील त्यावेळी आजूबाजूच्या शेतीत थोडेफार काम मिळवून त्यावर उदरनिर्वाह करायचे. बाबानींही काम करायचे ठरवले. आजीने सुचवल्यानुसार त्यांनी आळंदीत दर्शनाला येणाऱ्या भाविकांना गंध लावायचे काम सुरू केले. त्यात दिवसाकाठी पाच ते सात रुपये इतकी कमाई होत असे. तेव्हा येथील संतोषीमाता मंदिराजवळ जलारामबाबा येथे माधुकरी (शिधा) मिळायची ते घेऊन यायचे आणि यावर ते पोट भरायचे. काही महिने असेच घालवल्यावर त्यांच्या वडिलांना पिंपरीत बूट आणि चप्पल कंपनीत काम मिळाले. मग सर्वांनी गांधीनगरमध्ये मुक्काम हलविला. गावाकडे खंडित झालेले बाबांचे शिक्षण येथे सुरू झाले. तिसरीत प्रवेश घेतला.

शिक्षण पुन्हा सुरू खराळवाडीतील पालिकेच्या शाळेत पुन्हा धडे गिरवणे सुरू झाले. तेही तब्बल दोन वर्षाच्या खंडानंतर. शिक्षण सुरू असताना घरातील परिस्थिती काही सुधारत नव्हती. दरम्यान आई या कागद-काच-पत्रा वेचण्याचे काम करायच्या. परिस्थिती सावरण्यासाठी बाबांनी पाचवीत शाळा सोडली. नंतर मिळेल तिथे, हॉटेल वगैरे येथे नोकरी करू लागले. दरम्यानच्या काळात आजोबांच्या सूचनेनुसार आळंदी येथे धार्मिक शिक्षण घेऊ लागले.

रिक्षा चालवायला सुरुवात

धार्मिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वडिलांनी रिक्षा चालविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार 1995 मध्ये रिक्षा चालवायला सुरुवात केली. रात्री 9 ते पहाटे 4 पर्यंत ते रिक्षा चालवत होते. रातराणी नावाने 24 तास रिक्षांची सेवा देणारे स्टॅण्ड त्यांनी सुरू केले.

सामाजिक कामात भाग

रात्री ते पहाटे रिक्षा चालवून दुपार पर्यंत बाबा कांबळे आराम करत होते. त्यानंतर विविध चर्मकार संघटनांसह, विविध सामाजिक कामात त्यांनी स्वतःला झोकून दिले. या काळात पुस्तकांचे वाटप सुरू केले. डॉ. बाबा आढाव यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव पडला आणि त्यांनी सामाजिक कामात स्वतःला झोकून दिले,कामगार नेते शरद राव, जेष्ठ समजसेवक, अण्णा हजारे, भाई वैद्य, मृणालताई गोरे, मेघा पाटकर,भारत पाटणकर, आदी नेत्यानं सोबत त्यांनी काम केले आहे,

रिक्षा पंचायतसह कष्टकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय

रिक्षा चालक-मालकांचे प्रश सोडविण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र रिक्षा पंचयतची स्थापना केली. त्यामुळे रिक्षा चालकांना आपले प्रश्न मांडण्यासाठी हक्काचे ठिकाण सुरू झाले. घरेलू कामगार महिलांवर अन्यायाच्या भावना होत्या. त्यासाठी बाबा कांबळे यांनी संघर्ष उभा केला. त्याचीच फलिती म्हणून 2007 मध्ये घरेलू कामगार कल्याण मंडळ स्थापन झाले.विद्यार्थ्यांचे कोणतेही रखडलेले प्रश्न सोडविण्यासाठी बाबा कांबळे यांनी पुढाकार घेतला आहे. रिक्षा चालकांना पीएफ व इतर सुविधा मिळवून देण्यासाठी आता त्यांचा संघर्ष सुरू राहणार आहे.