धक्कादायक : पवना नदीत भराव व मैला मिश्रित सांडपाणी | पवना नदीचे अस्तित्वच धोक्यात

धक्कादायक : पवना नदीत भराव व मैला मिश्रित सांडपाणी | पवना नदीचे अस्तित्वच धोक्यात
  • नदी प्रदूषणाकडे पर्यावरण विभागाचे “अर्थपूर्ण” दुर्लक्ष; अपना वतनची आयुक्तांकडे तक्रार

पिंपरी : मागच्या महिन्यातच पालिकेने गाजत वाजत पर्यावरण दिन साजरा केला. परंतु, पिंपरी चिचंवड पर्यावरण विभाग मात्र, शहरातील नदीप्रदूषणच्या बाबतीत गंभीर नसल्याचे दिसत आहे. राष्ट्रीय हरिद लवाद, पर्यावरण संबंधीचे अति व नियम यांचे सरासपणे उल्लंघन करून पर्यावरणाची हानी करणाऱ्या ठेकेदारांना पालिका स्वतःच पाठीशी घालते कि काय? असा प्रश्न अपना वतन संघटनेने विचारला आहे.

खिल्लारी इन्फ्रास्टक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून काळेवाडी येथील पवना नदीपात्रात पूररेषेत बेकायदेशीर भराव टाकून नदीपात्र अरुंद केले जात असलेबाबाबत व रसायनयुक्त मैलामिश्रित सांडपाणी नदीत सोडून नदी प्रदूषित करीत असल्याने ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख यांनी पालिका आयुक्त राजेश पाटील व उप प्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण महामंडळ, पिंपरी चिचंवड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हंटले आहे कि, काळेवाडी, बीआरटी रोडच्या लागत परिसरामध्ये नदीच्या पात्रात भराव टाकून अनधिकृत बांधकामे केलेली आहेत. त्यामध्ये वोर्कशॉप, फॅब्रिकेशन, हॉटेल्स, मंगल कार्यालये, गोडाउन्स अशा आस्थापनांचा समावेश आहे. शहरात काही जणांनी पर्यावरणाचा ऱ्हास करण्याचा ध्यास घेतलेला आहे. प्रदूषणच्या नियमांची पायमल्ली करीत अनेकांनी नियम धाब्यावर बसवलेले आहेत. काळेवाडी स्मशानभूमीच्या माघे एका ठेकेदारामार्फत नदीपात्रात काम चालू आहे. परंतु त्यांच्याकडून प्रदूषण व पर्यावरण विषयक नियमांचे उल्लंघन केले जात आहे. काळेवाडी स्मशानभूमीच्या पासून ते एम्पायर इस्टेट पुलाच्या दिशेने १ किमी अंतरापर्यंत पवना नदीपात्रात पुरेषेमध्ये पोकलेन व जेसीबीच्या साहाय्याने मुरुमचा बेकायदेशीर भराव टाकण्यात येत आहे. या भरावामुळे नदीचा काही भाग अक्षरशः बुजुन गेलेला आहे.

यामुळे पवना नदीचे मूळ पात्र अरुंद होत असून पावसाळ्यामध्ये येणाऱ्या पाण्यामुळे परिसरात पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते. पवना नदीपात्रालगत पूररेषेमध्ये भराव टाकून व्यावसायिक अतिक्रमण करण्याचे प्रकार सर्रासपणे चालू आहेत. पवना नदीपात्रात ठेकेदाराकडून काम सुरु असून नागरी मैलामिश्रित सांडपाणी पंपाने उपसून पवना नदीमध्ये सोडले जात आहे. काही दिवसांपूर्वीच शहरातील इंद्रायणी, पवना या दोन्ही नद्यांचे प्रदूषण चिंताजनक असल्याचा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाहीर केला होता. याचे गांभीर्य पिंपरी चिचंवडच्या पर्यावरण विभागाला नसल्याचे निदर्शनास येत आहे. यापूर्वीही अनेकांनी शहरातील नदी प्रदूषण संदर्भात अनेक तक्रारी केलेल्या आहेत. परंतु संबंधित यंत्रणांकडून नदी प्रदूषणच्या तक्रारींकडे कानाडोळा करण्यात आलेला आहे.

काळेवाडी पवना नदीपात्रात भराव टाकून तसेच राडारोडा टाकून व मैलामिश्रित सांडपाणी पवना नदीत सोडून ठेकेदाराने पाण्यातील जीवसृष्टीला व पर्यावरणाला धोका निर्माण होईल असे कृत्य केल्याने जल (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) कायदा, १९७४ , पर्यावरण संरक्षक कायदा १९८६, महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम आणि महाराष्ट्र महापालिका अधिनियम नुसार मे. खिल्लारे इन्फ्रस्टकचर कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी अपना वतन संघटनेकडून करण्यात येत आहे. सदर मागणीची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कडक कारवाई करावी. असे निवेदनात नमूद केले आहे.