- उन्नती सोशल फाऊंडेशन आणि ब्रम्हचैतन्य क्लीनिक यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन
पिंपरी : उन्नती सोशल फाऊंडेशन आणि ब्रम्हचैतन्य क्लीनिक यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळे सौदागर येथे मोफत सांधेदुखी उपचार व नशामुक्ती शिबिराचे उदघाटन आज करण्यात आले. १९ नोव्हेंबर आणि २० नोव्हेंबर असे दोन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिराचे उदघाटन उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी ब्रम्हचैतन्य क्लिनिकचे डॉ. ओंकार बाबेल, राजस्थान औषधालयाचे महेश लोखंडे, श्री संजय भिसे व्हा. चेअरमन यशदा रिअलिटी ग्रुप, श्री रमेश वाणी, डॉ सुभाषचंद्र पवार, श्री अशोक वारकर या मान्यवरांसह पिंपळे सौदागर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर शिबिरामध्ये पाठदुखी, कंबर दुखी,गुडघे, मान, हाता-पायाचे सांधे याची तपासणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नशामुक्ती शिबिरामध्ये दारू, सिगारेट, ड्रग्स यांसारख्या नशेच्या आहारी गेलेल्या तरुणांना व नागरिकांना या व्यसनापासून मुक्त करण्यासाठी त्यांच्यावर योग्य उपचार आणि समुपदेशन करण्यात येणार आहेत.
यासंदर्भात बोलताना उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे म्हणाल्या की, तरुणाई नशेच्या आहारी जाऊन गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य करतात. व्यसन लागल्यावर त्यांची मानसिक स्थिती बिघडते. याचे दुष्परिणाम त्यांच्या कुटुंबावरच नव्हे तर संपूर्ण समाजावर पडतात. तरुण भारताचे भविष्य आहेत, त्यामुळे त्यांना व्यसन व गुन्हेगारी वृत्तीपासून दूर करता यावे यासाठी शिबिर घेतले जात आहे.
मागील दोन वर्षांच्या कोरोना काळात लॉकडाऊनमधील बंदिस्त जीवनमानमुळे नागरिकांच्या आरोग्यावर त्याचे परिणाम झालेले दिसून येत आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना सांधेदुखीच्या आजाराचा सर्वाधिक सामना करावा लागत असल्याचे समोर आले आहे. त्या पार्श्वभूमीवर आम्ही या शिबिराचे आयोजन केले असून जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुंदाताई भिसे यांनी यावेळी केले.