पिंपरी : पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठी कामगिरी केली आहे. शहरात पिस्टल सप्लाय करणाऱ्या मोठ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. या टोळीकडुन तब्बल 14 पिस्टल आणि 08 जीवंत काडतुस असा एकुण 04 लाख 90 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दरोडा विरोधी पथकाच्या या कामगिरी बद्दल अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी पथकाला 10 हजार रुपयांचे बक्षिस आणि प्रमाणपत्र जाहिर केले आहे.
1) आकाश अनिल मिसाळ (वय- 21 वर्ष, रा. प्रेम विला, रेणुका माता मंदिर समोर. इंद्रायणी नगर, भोसरी), 2) रुपेश सुरेश पाटील (वय- 30 वर्ष, रा. मु. पो. वडगाव बुद्रक, ता. चोपडा, जि. जळगाव) आणि 3) ऋतिक दिलीप तापकिर (वय- 26 वर्ष, रा. पांडुरंग हाईटस्, मुक्ता रेसीडेन्सी समोर, सुतारवाडी, लास्ट बस स्टॉप, पाषाण, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी पत्रकार परीषदेत दिलेल्या माहितीनुसार, दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांचे पथक पिस्टल बाळगणे प्रकरणी यापूर्वी अटक केलेल्या रेकॉर्डवरील आरोपींची माहिती प्राप्त करुन घेत असताना पथकातील पोलीस नाईक सागर शेडगे यांना माहिती मिळाली की, वडमुखवाडी, चऱ्होली येथे दोन दुचाकीवर पाच इसम हे विनाकारण फिरत आहेत. त्यांच्या हालचाली संशयास्पद आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे आणि पोलीस उप-निरीक्षक मंगेश भांगे यांनी एक पथक तयार करुन पथकाला सुचना केल्या. वरिष्ठांच्या सुचना प्रमाणे पथकाने सापळा रचुन मोठ्या शिताफिने सोमवार (ता.3) रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास पाच पैकी तीन इसमांना ताब्यात घेतले. मात्र, पोलीसांची चाहुल लागताच दोन इसम एका मोपेड गाडीवरुन पसार झाले.
ताब्यात घेतलेल्या इसमांची अंगझडती घेतली असता 02 पिस्टल, 02 जिवंत राऊंड, 03 मोबाईल फोन, मिरची पुड, नायलॉन दोरी आणि 01 लाख 51 हजाराची एक मोपेड गाडी असा माल मिळुन आला. या इसमांकडे पथकाने आणखी सखोल चौकशी केली असता हि टोळी हत्यारानिशी कृष्णाई पेट्रोल पंप, हॉटेल जाळीचा मळा समोर, अलंकापूरम रोड, वडमुखवाडी, चऱ्होली येथे दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आले असल्याचे निष्पन्न झाले. दिघी पोलीस ठाण्यात या इसमां विरुद्ध गुन्हा दाखल झाला असुन न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
आरोपींकडे पोलीस कोठडीत तपास केला असता आरोपी रुपेश पाटील व ऋतिक तापकिर यांच्या फ्लॅट मधुन 06 गावठी कट्टे व जिवंत काडतुस आणि आरोपी आकाश मिसाळ याच्या भोसरी, इंद्रायणी नगर येथील घरातुन 04 गावठी कट्टे, जिवंत काडतुस असे एकुण 10 गावठी कट्टे (पिस्टल) किंमत रुपये 02 लाख 19 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हि सर्व पिस्टल मध्यप्रदेश येथुन आणली असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पुढील तपास सुरु आहे. आरोपी रुपेश पाटील हा पिस्टल तस्करी करणारा सराईत गुन्हेगार आहे. चिंचवड, देहुरोड, भोसरी पोलीस ठाणे येथे गंभीर स्वरुपाचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. तर आकाश मिसाळ हा देखील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन भोसरी पोलीस ठाणे येथे त्याच्यावर हाणामारी केल्याचा गुन्हा दाखल आहे.
या दोन्ही आरोपी आणि त्यांच्या साथीदाराकडुन यापूर्वी 24 पिस्टल आणि 16 जीवंत काडतुस हस्तगत करण्यात आली आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर खंडणी विरोधी पथकाची हि मोठी कामगिरी आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. काकासाहेब डोळे, सहायक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, पोलीस उप-निरीक्षक मंगेश भांगे, पोलीस अंमलदार महेश खांडे, उमेश पुलगम, नितीन लोखंडे, आशिष बनकर, सागर शेडगे, गणेश कोकणे, राजेश कौशल्ये, राहुल खारगे, विक्रांत गायकवाड, राजेंद्र शिंदे, औदुंबर रोंगे, गोविंद सुपे, नागेश माळी, पोलीस हवालदार शेटे यांच्या पथकाने हि कामगिरी केली आहे.