क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना आम आदमी पार्टीतर्फे अभिवादन

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना आम आदमी पार्टीतर्फे अभिवादन
  • ‘महिला शिक्षण दिना’च्या आपकडून शुभेच्छा

पिंपरी : येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोरील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्यास आपच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

“क्रांतीज्योती सावित्रीबाई खऱ्या अर्थानं देशातील स्त्रीशिक्षणाच्या जननी आहेत. सावित्रीबाईंनी स्त्रीसक्षमीकरणासाठी काम केलं. महिलांवरील अन्यायाविरुद्ध लढा दिला. त्या सत्यशोधक विचारांच्या क्रांतिकारी समाजसुधारक होत्या. देश व देशातील स्त्रीशक्ती क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या कार्याबद्दल कृतज्ञ आहे.” अशा शब्दात आपचे कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बोलतांना म्हटले.

त्याप्रसंगी आम आदमी पार्टी संपर्कप्रमुख वैजनाथ शिरसाट म्हणाले की, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांना त्यांच्या प्रत्येक कार्यात सावित्रीबाईंची समर्थ साथ लाभली. देशात स्त्रीयांची पहिली शाळा महात्मा फुले यांनी सुरु केली आणि त्या शाळेत पहिली स्त्री शिक्षिका होण्याची जबाबदारी सावित्रीबाईंनी उचलली. स्त्रियांच्या शिक्षणासाठी या दोघांनी केलेलं कार्य व घेतलेले कष्ट सदैव स्मरणात राहतील. देशातील स्त्रीशक्ती आज सर्व क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून योगदान देत आहे. स्वातंत्र्याचा अनुभव घेत आहे, याचं श्रेय क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी त्याकाळात स्री शिक्षणासाठी घेतलेले कष्ट व सहन केलेल्या हाल अपेष्टांना आहे.

त्यावेळी आम आदमी पार्टीचे नेते एकनाथ पाठक, ब्रह्मानंद जाधव, आशितोष शेळके, ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश परदेशी, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर ननावरे, मोहन जाधव, रमेश ठोंबरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.