काळेवाडीत होणार आदर्श महिलांचा सन्मान

काळेवाडीत होणार आदर्श महिलांचा सन्मान
  • गौरी गणपती सजावट स्पर्धा २०२१ व नवरात्र नवरंग उत्सव २०२१ स्पर्धेचे होणार बक्षिस वितरण

काळेवाडी, ता ६ : नगरसेविका निता पाडाळे व संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विलास पाडाळे यांच्यातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त परिसरातील आदर्श महिलांचा सन्मान केला जाणार आहे. तसेच गौरी गणपती सजावट स्पर्धा २०२१ व नवरात्र नवरंग उत्सव २०२१ स्पर्धेचे बक्षिस वितरण सोहळा यावेळी पार पडणार आहे. या समारंभाचे औचित्य साधून महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे.

काळेवाडी-ज्योतिबा नगरमधील ज्ञानेश्वर मंगल कार्यालय येथे सोमवारी (ता. ७) सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. तसेच परिसरातील सामाजिक, शैक्षणिक, उद्योग, कला, क्रिडा अशा विविध क्षेत्रात ठसा उमटविणाऱ्या होतकरू व कर्तृत्वान आदर्श महिलांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे.

दरम्यान होम मिनिस्टर कार्यक्रमात महिलांना पैठणी व अनेक बक्षिसे जिंकण्याची संधी आहे. तसेच स्पर्धेत सहभागी महिलांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून संस्कृती प्रतिष्ठाणच्या वतीने आयोजित केलेल्या गौरी गणपती सजावट स्पर्धा २०२१ व नवरात्र नवरंग उत्सव २०२१ स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभही यावेळी पार पडणार आहे. तरी जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावावी, असे आवाहन नगरसेविका निता पाडाळे व सामाजिक कार्यकर्ते विलास ज्ञानेश्वर पाडाळे यांनी केले आहे.