पिंपरी, (लोकमराठी) : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने जानेवारी २०२० मध्ये महापालिका परिसरातील महापालिका व खाजगी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील शालेय विद्यार्थी खेळाडू यांच्या महापौर चषक शालेय क्रीडा स्पर्धा २०२० (Teen 20) या स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्या अनुषंगाने संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे आज सभा आयोजित करण्यात आली होती.
त्यावेळी ऑनलाईन प्रवेशिका, स्पर्धा ठिकाणे, स्पर्धेकरिता लागणारे पंच, स्पर्धा अनुषंगाने करावयाची तयारी, विजेते, उपविजेते खेळाडूंना द्यावयाची बक्षिसे व स्पर्धा अनुषंगाने इतर बाबींवर चर्चा करण्यात आली.
त्याप्रसंगी महापालिका, खाजगी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक व संबंधित खेळांच्या संघटनांचे पदाधिकारी त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड महापालिकेचे क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीचे सभापती तुषार हिंगे, सदस्य अभिषेक बारणे, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, सहाय्यक आयुक्त (क्रीडा) संदिप खोत, क्रीडा अधिकारी, क्रीडा पर्यवेक्षक रज्जाक पानसरे आदी उपस्थित होते.
तुषार हिंगे यांनी स्पर्धेच्या अनुषंगाने महापालिकेची भुमिका स्पष्ट केली. तर अजित पवार उपस्थित क्रीडा शिक्षक व संघटनेच्या पदाधिका-यांना संबोधित करत उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली व स्पर्धा पूर्वी सर्व शाळेच्या शिक्षकांची स्पर्धा पूर्व तयारी व प्रशिक्षण यासाठी नजिकच्या काळात एक कार्यशाळा आयोजित करण्यासंबंधी सुचना दिल्या. सभेच्या शेवटी संदिप खोत यांनी उपस्थितांचे आभार मानुन महापौर चषक शालेय क्रीडा स्पर्धा २०२० (Teen 20) अनुषंगाने शाळांनी सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी करण्याचे आवाहन केले.
या खेळांचा आहे समावेश
या स्पर्धेत फुटबॉल, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, मैदानी खेळ (अॅथलेटिक्स), बुद्धीबळ, बॅडमिंटन, जलतरण, स्केटिंग, हॉकी, कुस्ती, थ्रोबॉल, योगा, क्रिकेट, स्केटिंग, बास्केटबॉल, कराटे इत्यादी १७ खेळ प्रकारांचा समावेश आहे.