नदीपात्रातील कचरा उचला अन्यथा आयुक्तांच्या कार्यालयात कचरा टाकू – विशाल वाकडकर

नदीपात्रातील कचरा उचला अन्यथा आयुक्तांच्या कार्यालयात कचरा टाकू – विशाल वाकडकर

पिंपरी-चिंचवड, (लोकमराठी) : देहुरोड – कात्रज बाह्यवळण महामार्गावर रावेत उड्डाणपूलाखाली नदिपात्रात मागील अनेक दिवसांपासून कचरा टाकण्यात येत आहे. तो कचरा पिंपरी चिंचवड मनपा प्रशासनाच्या आरोग्य विभागाने ताबडतोब उचलावा व कचरा टाकणा-या संबधित ठेकेदारांवर किंवा जबाबदार असणा-या व्यक्तींवर प्रशासनाने गुन्हे दाखल करावेत, अन्यथा पुढील दोन दिवसात तो कचरा आयुक्तांच्या कार्यालयात आणून टाकू असा इशारा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक अध्यक्ष विशाल वाकडकर यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या पत्रात दिला आहे.

रावेत जलउपसा केंद्राच्या वरच्या टप्प्यात हा कचरा टाकण्यात येत आहे. त्यातून दुर्गंधीयुक्त अस्वच्छ पाणी नदीतील पाण्यात मिसळत आहे. तेच दुषित पाणी रावेत जलउपसा केंद्रातून शहरातील 25 लाखांहून जास्त लोकसंख्येला पाणी पुरवठा करण्यासाठी उचलले जाते. या पाण्यात कच-यातील हानीकारक जीवजंतू आणि त्यामुळे उद्‌भवणारे आजार पाणी पुरवठ्यातून शहरातील नागरिकांच्या घरापर्यंत पोहचविण्याचे काम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा आरोग्य विभाग व पाणी पुरवठा विभाग संगणमताने करीत आहे. आयुक्तांचा प्रशासनावर अंकुश नसल्यामुळे शहरातील नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. शहरातील करदात्या नागरिकांच्या पैशातून मनपा प्रशासन स्वच्छ भारत अभियानाची जाहिरात करण्यात मश्गूल आहे. स्थानिक पातळीपासून केंद्रापर्यंत भाजपाचेच सरकार असताना पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियानास पिंपरी चिंचवड मनपा प्रशासन केराची टोपली दाखवित आहे. नुकत्याच येऊन गेलेल्या पावसामुळे नदिपात्रात अनेक ठिकाणी वाढलेल्या झाडा – झुडूपात कचरा अडकलेला आहे. तो काढून नदि परिसर स्वच्छ केला जावा, हि करदात्या नागरिकांची अपेक्षा असताना उलट प्रशासनाच्या आशिर्वादाने कचरा उचलणारे ठेकेदार येथे हजारो टन कचरा टाकून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणत आहेत. मागील अनेक दिवसांपासून टाकलेल्या या कच-यामुळे परिसरात दुर्गंधीचा व मच्छरांचा त्रास नागरिकांना होत आहे. दिवसाढवळ्या रोज कच-याचे ढंपर या ठिकाणी खाली होत आहेत. याकडे अजूनही संबंधित अधिका-यांचे, कर्मचा-यांचे लक्ष कसे गेले नाही? या बाबतही येथील नागरिकांमध्ये संताप आहे. ताबडतोब हा कचरा उचलला जावा, अशी मागणी येथील नागरिकांची आहे. अन्यथा पुढील दोन दिवसांनंतर उद्‌भवणा-या परिस्थितीस आयुक्त श्रावण हर्डीकर हे जबाबदार असतील असेही राष्ट्रवादी शहर युवक अध्यक्ष विशाल वाकडकर यांनी पत्रात म्हटले आहे.

नदीपात्रातील कचरा उचला अन्यथा आयुक्तांच्या कार्यालयात कचरा टाकू – विशाल वाकडकर