महाराष्ट्र हित महत्त्वाचे! जनमताचा आदर व्हायला हवा!

काँग्रेसचे तरुण नेते शिवसेनेसोबत सत्तेसाठी उत्सुक!

शीतल करदेकर

काँग्रेस पक्षाचे मुंबईचे माजी अध्यक्ष संजय निरुपम हे काँग्रेस पक्षासाठी हितकारक कधी होते. याचा शोध आणि बोध पक्षाने घेण्याची वेळ आली आहे. बदलत्या राजकीय समीकरणात अनेक पक्ष प्रादेशिक पातळीवर सहकार्य करून सत्ता स्थापन करत आहेत, त्यात भारतीय जनता पार्टी पक्ष आघाडीवर आहे. सत्ता मिळवणे आणि मिळवलेल्या सत्तेचा लोकहितासाठी उपयोग करणे हा उद्देश मुख्यता असायला हवा. मात्र, मागील अनेक वर्षात जुनी राजकारण बदलून व्यक्तिकेंद्री राजकारणाला खतपाणी मिळाले आहे.

विविध पक्ष, त्यात विविध गट आणि सत्ताकेंद्रे तयार झालीत. विविध प्रांतात अनेक वतनदार तयार झाले. शिक्षण महर्षी, कार्यसम्राट, कारखानदार आणि आता व्यापारी वाढले! मिळालेल्या सत्तेचा गैरवापर न करता जनतेचे पालक म्हणून काम करणे, हाच मुख्य उद्देश असायला हवा हे बहुसंख्य  राजकारणी विसरले आहेत. असो महाराष्ट्राच्या या निवडणुकीत काँग्रेसचा चेहरा प्रकर्षाने उभा राहिला नाही. मुंबई तर काँग्रेस प्रभावहीन होती. याचे मुख्य कारण, राहुल गांधी जरी हुशार असले नवीन विचारांनी प्रेरित असले तरी त्यांच्या आजूबाजूला असणारे झुलकरी आणि स्वार्थी लोक हेच मोठा घात करताना दिसले. असे चित्र याच पक्षात असं नाही तर सर्व राजकीय पक्षांमध्ये दिसून येतं. नेता जाणता असावा सर्वसमावेशक असावा दूरदृष्टीवाला असावा, अचूक निर्णय घेण्याची, परिणामांना सामोरे जाण्याची क्षमता असणारा असावा आणि त्याचे तळागळातील कार्यकर्त्यांपर्यंत संपर्क असावा. ही अपेक्षा असते.

काँग्रेसला नव्या नेतृत्वाची गरज!

काँग्रेसमध्ये अनेक वर्षांपासून असलेला साचलेपणा दूर करून जुन्या खोडांना बाजूला काढून नवीनांना संधी देऊन आणि अंतर्गत राजकारण करणाऱ्यांना योग्य समज देऊन पक्षावर मजबूत पकड असणा-या नेत्यांची गरज आहे. मागील निवडणुकीतील अपयशय हे याचेच उदाहरण आहे. पक्षाचा चेहरा राहुल गांधी  होते आणि काँग्रेसमध्ये नसलेल्या राजकीय व सामाजिक समजाचे आणि कार्यशैली परिणामांचे सगळे श्रेय राहुल गांधीला दिले गेले. केवळ राहुल गांधी हेच काँग्रेस अपयशाला आणि पक्षीय अधोगतीला कारणीभूत आहेत का , याचा विचार होण्याची गरज आहे.

सध्याच्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात अत्यंत समंजसपणे व्यक्त होताना दिसतात. सुशील कुमार शिंदे अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण ,माणिकराव ठाकरे असे जबाबदार नेते  काँग्रेसला एका साच्यात ठेवून अडखळताना दिसतात. काँग्रेसमधील अनेक तरुण नेते शिवसेनेसोबत जाऊन सत्ता स्थापनेस मदत करण्यास तयार असल्याचे चित्र मॅडम हायकमांड सोनिया गांधींपर्यंत गेले नसावे आणि म्हणून काँग्रेसचा निर्णय घेण्यास विलंब लागला असावा असा कयास आहे निवडणुकीआधी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि इतर पक्ष मिळून आघाडी होण्याचे चिन्ह होतं, मात्र खोडा घातला तो महाराष्ट्रातील संदेश वाहक दिग्गज दूतांनी असं सयजते.

असो आता संजय निरुपम जे या निवडणुकीत कुठेही दिसले नाहीत ते आता ट्विटरवर बोलतात की सत्ता स्थापन करणे ही काँग्रेसची नैतिक जबाबदारी नाही. हे महाशय दोपहर का सामनाचे माजी संपादक, मा. बाळासाहेबांनी डोक्यावर हात ठेवल्यामुळे मोठे झाले, काँग्रेस पक्षात गेले आणि आणखी मोठे झाले. मात्र पक्षीय राजकारणात इतके गुंतले की, लोकहित विसरले? का बोलतो आपण? जबाबदारी काय आपली? याचं भान यांना नाही हे वास्तव!

हीच गोष्ट महाराष्ट्रातील काँग्रेसच्या दिग्गजांबद्दल म्हणता येईल. युती तुटली ते सगळ्यांनीच पाहिलं. दुसरा मोठं संख्याबळ असणारा असणारा पक्ष शिवसेना आघाडीतून बाहेर पडून सहकार्य मागत असताना हे वेळेत का स्वीकारली जात नाही? अशी विचारणा काँग्रेसमधील अनेक तरुण आमदार आणि नेते करत आहेत. माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधींच्या वेळी, काँग्रेसला केलेले सहकार्य विसरून चालणार नाही. महाराष्ट्रातील प्रतिभाताई पाटील या महिला राष्ट्रपती होत आहेत असे म्हटल्यावर शिवसेनाप्रमुखांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा दिला होता! आज राम मंदिर विषय मार्गी लागला आहे.

शिवसेना जरी हिंदुत्ववादी संघटना असली तरी सर्वसमावेशक भूमिकेतून आज काम करताना दिसते आणि देश प्रेमी मुसलमान हे आमचेच आहेत हे ठासून सांगणारे बाळासाहेब हे मुस्लीमविरोधी नव्हते हे जग जाहीर आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला भाजपाला सत्तेपासून रोखायचे आहे. शिवसेनेच्या रूपाने मिळालेली सुवर्णसंधी स्वीकारणे आणि सत्तेसाठी यानी वेळेत सहकार्य करणे अपेक्षित होते. यात पुढाकार घेण्याचे मोठे काम राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले. पवार मोठे होत आहे हे काही काँग्रेस दिग्गजांना रुचत नसावे आणि म्हणून पवारांच्या पुढाकारात नाही तर आपल्या शर्तीवर सत्ता मिळवायची अशीच या लोकांची मानसिकता दिसते .    

मात्र, पुन्हा निवडणूक ही राज्याला पडणार नाही. जनक्षोभ होईल याचा विचार सगळ्यांनीच करायला हवा. खूप महत्त्वाचं…काँग्रेसला गांधी परिवारातून बाहेर पडून नव्या चेहऱ्याचे नेतृत्व मिळण्याची गरज आहे. पण हे सांगण्याचे धाडस कोणीही करत नाही कारण मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? पटेल व गडकरी भेटीत वाड्रा व इतर नेते बचाव डिल झाल का? अशी जोरदार चर्चा आहे. आणि जर या जोरावर महाराष्ट्रात काँग्रेस बँकफूटवर जात असेल तर यांचे सारखे दुर्दैवी हेच! खरं तर हीच ती वेळ आहे !महाराष्ट्र देशाला एक उदाहरण देऊ शकतो.

चुकीला माफी नाही

काँग्रेस कधी जागी होईल तेव्हा होवो, पण महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याच्या दिशेने ची वाटचाल होत आहे आणि जी लोकमताची फरफट चालू आहे ती महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान करणारी आहे आणि ती सर्वच पक्षांना नुकसानकारक आहे .राजकारणासाठी राजकारण नक्कीच व्हावे पण जनमताचे राजकारण आता जनता खपवून घेणार नाही काँग्रेसने, काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी आतातरी आपले विचार बदलण्याची आणि डोळे आणि डोकं उघडे ठेवून काम करण्याची गरज आहे नाहीतर काहीच खरं नाही!