इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन उभारून कुंदाताईंनी निर्माण केला आदर्श – महापौर माई ढोरे

इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन उभारून कुंदाताईंनी निर्माण केला आदर्श - महापौर माई ढोरे
  • पिंपळे सौदागरमधील उन्नती कार्यालय येथे चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन
  • पिंपरी-चिंचवडमधील मोफत चार्जिंग देणारा एकमेव पायलट प्रोजेक्ट

पिंपरी : इंधनावरील वाहनांची संख्या वाढल्यामुळे पर्यावरण संवर्धनाला बाधा पोहोचत आहे. त्यामुळे निर्माण होणा-या प्रदुषणामुळे नागरिकांच्या जीवनावर दुरगामी परिणाम होत आहे. प्रदुषणाला आळा बसून पर्यावरण संवर्धन होण्यासाठी आपल्याला विधायक पाऊल उचलायला हवे. झाडे लावण्याबरोबरच कुंदाताई भिसे यांनी प्रदुषणाला आळा घालण्यासाठी इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन सुरू करून इलेक्ट्रीक वाहणे वापरणा-यांना प्रोत्साहन दिले आहे. इलेक्ट्रीक वाहनांना न नफा न तोटा या तत्वावर मोफत चार्जिंगची सुविधा निर्माण करून कुंदाताईंनी पिंपरी-चिंचवडमध्ये आदर्श निर्माण केला आहे, अशी भावना महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केली.

उन्नती सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून पिंपळे सौदागर परिसरातील इलेक्ट्रीक वाहने वापरणा-या नागरिकांसाठी जरवरी हाऊसिंग सोसायटी येथील उन्नती सोशल फाऊंडेशन कार्यालय येथे मोफत चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन महापौर ढोरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी अध्यक्षा कुंदाताई भिसे, सामाजिक कार्यकर्ते संजय आबा भिसे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, पी. के. शाळेचे संस्थापक जगन्नाथ काटे, अतुल पाटील, राजेंद्रनाथ जयस्वाल, रमेश वाणी, धनंजय भिसे, सखाराम धाकाणे, रमेश चांडगे व विविध हाऊसिंग सोसायटीतील नागरिक उपस्थित होते.

उन्नतीच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे म्हणाल्या की, आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये वेळेची कमतरता भासत आहे. दैनंदीन कामकाजाचे नियोजन करत असताना आपण रहात असलेला परिसर राहण्यायोग्य कसा राहील, याचा देखील प्रत्येकाने विचार करणे गरजेचे आहे. कारण, आज पेट्रोल, डीझेलच्या गाड्या सर्वत्र पाहायला मिळत आहेत. इंधनाच्या गाड्यांची संख्या वाढल्यामुळे पिंपळे सौदागर परिसरात प्रदुषण वाढत आहे. त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर घातक परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आता इलेक्ट्रीक दुचाकी, चारचाकी वाहने वापरणे फायदेशीर ठरणार आहे. अशी वाहने वापरण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी आपण मोफत इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन सुरू केले आहे. त्याचा नागरिकांनी जास्तीत जास्त वापर करून प्रदुषण रोखण्यास मदत करावी.

पिंपरी-चिंचवडमधील एकमेव पायलट प्रोजेक्ट…

उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेला इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन प्रकल्प पिंपळे सौदागरच नव्हे तर संपूर्ण पिंपरी-चिंचवडमधील एकमेव पायलट प्रोजेक्ट आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने सुध्दा असा प्रोजेक्ट सुरू केला नाही. कारण, शहरात आता इलेक्ट्रीक वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याचे फायदे लक्षात घेऊन महापालिकेने शहरात चार्जिंग स्टेशनची सुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे. वाहनांची संख्या वाढत असली तरी चार्जिंग स्टेशनची उणीव भासत आहे. पिंपळे सौदागर परिसरात मोफत चार्जिंग स्टेशन सुरू करून ती उणीव भरून काढण्याचे काम कुंदाताई भिसे यांनी केले आहे. संपूर्ण पिंपळे सौदागरमधील नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे.