महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे जिल्हा महिलांसाठी आयोजित चमत्कार प्रशिक्षण शिबिराला उदंड प्रतिसाद

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे जिल्हा महिलांसाठी आयोजित चमत्कार प्रशिक्षण शिबिराला उदंड प्रतिसाद

लोकमराठी न्यूज नेटवर्क

ठाणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ठाणे जिल्ह्याच्या वतीने डोंबिवली (प.) येथील जोंधळे हायस्कूल येथे रविवारी (ता. १३) महिलांसाठी एक दिवसीय चमत्कार प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, ठाणे शहर, मुरबाड, अशा विविध ठिकाणाहून जवळपास ३५ हून अधिक महिलांनी प्रशिक्षणार्थी म्हणुन सहभाग नोंदवत उदंड प्रतिसाद दिला.

बुवा-बापू ,महाराज, तांत्रिक-मांत्रिक व पूजा-पाठ कर्मकांडाच्या माध्यमातून स्त्रियाच जास्त शोषणाला बळी पडतात. समाजातील स्त्रियांना प्रशिक्षित करून त्यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोबत जोडून घेऊन, त्यांच्यामार्फत इतर महिलांना जागृत करण्याचे काम करावे, समाज प्रबोधन करावे. हा या शिबिराचे आयोजन करण्यामागचा उद्देश असल्याचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य प्रा. प्रवीण देशमुख यांनी आपल्या प्रास्ताविकात स्पष्ट केले.

या एक दिवसीय शिबिराच्या सकाळच्या सत्रात अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संबंधित विविध विषयाची माहिती प्रशिक्षणार्थी महिलांना करून देण्यात आली. सुरूवातीला वैज्ञानिक दृष्टिकोनावर बोलतांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सोशल मीडियाचे सदस्य प्रसाद खुळे यांनी निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती, वारंवार आणि सार्वत्रिक प्रचिती ह्या विविध पातळ्यांवर एखाद्या गोष्टीचे सत्य कसे तपासावे, हे सांगितले. तसेच कार्यकारणभाव कसा तपासावा हे विविध उदाहरणांचे दाखले देत समजावून सांगितले. जेवढा पुरावा तेवढाच विश्वास ठेवावा, हे त्यांनी आवर्जून नमूद केले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे जिल्हा महिलांसाठी आयोजित चमत्कार प्रशिक्षण शिबिराला उदंड प्रतिसाद

अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीत काम करताना स्क्रीझॅाफ्रेनिया, कंपल्सिव डिस्आर्डर, भास, व्यसन इत्यादीसह विविध सामान्य मानसिक आजाराची लक्षणे समजून घेणे हे समाजप्रबोधनाचे काम करणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील प्रत्येक कार्यकर्त्याने अत्यंत गरजेचे आहे. असे प्रतिपादन प्रख्यात मानसोपचार तज्ञ डॉ दुष्यंत भादलीकर यांनी केले.

मानसिक आजारांवर मार्गदर्शन

त्यानंतर डाॅ. दुष्यंत भादलीकर यांनी विविध सामान्य मानसिक आजारांवर लक्षणे आणि कारणीमीमांसेसह सविस्तर मार्गदर्शन केले. अनेक सवयी वेळीच समजून घेतल्या नाही, तर त्या कालांतराने कशा मानसिक आजारांमध्ये परिवर्तीत होतात, त्याची अनेक उदाहरणे त्यांनी दिली. मुळात अशा सवयी या ‘आजार’ आहेत हेच समजून घ्यायला, त्या व्यक्ती तयार नसतात किंवा कुटुंबातील इतरांनाही त्याची माहिती नसते. त्याचे भयंकर दुष्परिणाम त्या मानसिक आजारी व्यक्तीसह कुटुंबातील सर्वांनाच नंतर भोगावे लागतात.

फलज्योतिष हे कसे थोतांड

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य विभाग पदाधिकारी जगदिश संदानशिव यांनी फलज्योतिष हे कसे थोतांड आहे, हे समजावून सांगितले. जन्मवेळ, कुंडली, वास्तुशास्त्र इत्यादी गोष्टींचा डोलारा वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास सपशेल कोसळतो, हे साध्या व सोप्या भाषेत उदाहरणांसह समजावून सांगितले.

ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष अशोक वानखेडे यांनी ‘स्त्रियांच्या अंधश्रद्धांवर भाष्य केले. स्त्री हि धर्म आणि कर्मकांडामुळे अंधश्रद्धांची वाहक कशी बनते, हे समजावून सांगितले. यावेळी प्रशिक्षणार्थी महिलांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली.

प्रशिक्षणाच्या दुसर्‍या सत्रात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सल्लागार मंडळाच्या सदस्य वंदनाताई शिंदे आणि राज्य विभाग पदाधिकारी राजू कोळी यांनी प्रशिक्षणार्थी महिलांना विविध चमत्कार शिकविण्याची जबाबदारी समर्थपणे पार पाडली. या चमत्कारांमध्ये पाण्याचा दिवा पेटविने, नारळातून करणी काढणे, जळता कापुर जिभेवर ठेवणे, नजरबंदी करणे, मंत्राने अग्निहोत्र पेटविणे, डोळ्यावर पट्टी बांधून वस्तू ओळखणे इत्यादी जनसामान्यांना अचंबित करणारे व चमत्कार वाटणारे प्रयोग सादर केले. त्याचबरोबर त्या पाठीमागील विज्ञान आणि हातचलाखी हे समजावून सांगितले. हे प्रयोग या प्रशिक्षणार्थी महिलांकडूनही करून घेण्यात आले.

चमत्कारमागे रासायनिक अभिक्रीया किंवा हातचलाखी

सुप्रसिद्ध जादुगार अभिजीत यांचीही विशेष उपस्थिती ह्या सत्रास लाभली. त्यांनी देखील ‘रिकाम्या हातातून पैशांचा पाऊस पाडणे’ हा सगळ्यांना थक्क करणारा प्रयोग केला. जादूगार चमत्कारामागे हातचलाखी आहे किंवा विज्ञान आहे, हे मान्य करतो व समाजाचे प्रबोधन करतो. तर, दुसर्‍या बाजूला बुवा-बापू महाराज याच गोष्टींना आपण दैवी शक्तीने चमत्कार करित असल्याची थाप मारून जनतेची फसवणूक करतात, हे त्यांनी स्पष्ट केले. कोणताही चमत्कार हा चमत्कार नसून एकतर रासायनिक अभिक्रीया तरी असते किंवा हातचलाखी तरी असते. तसेच ‘चमत्कार करणारे बाबा-बुवा बदमाश असतात, भोंदू असतात तर चमत्काराला फसणारे मुर्ख असतात’ हे ठासून सांगण्यात आले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे जिल्हा महिलांसाठी आयोजित चमत्कार प्रशिक्षण शिबिराला उदंड प्रतिसाद

त्याप्रसंगी लोकसत्ताचे भगवान मंडलिक, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते बापु राऊत, प्रख्यात दंतरोग तज्ञ डॅा. नितीन जोशी, नितीन सेठ, जिल्हा पदाधिकारी अविंदा वाघमारे, अरुण तायडे, बबन सोनवणे, कवियत्री अनिता देशमुख, अ‍ॅड. आरूषी काळे, संध्या देशमुख, शाहीर स्वप्निल शिरसाठ, उल्हासनगर येथील असंघटित महिला संघटनेच्या नेत्या मीरा सपकाळे, मोहने शाखेचे पदाधिकारी अश्विनीताई माने, राजेश मोरे व कार्यकर्ते या कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थित होते.

एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराच्या शेवटी शिबिरार्थींना चमत्काराचे सर्व साहित्य विनामूल्य देण्यात आले. सगळ्या महिला शिबिरार्थींनी यापुढे अंनिसचे काम करणार असल्याचा मानस व्यक्त केला.

या कार्यशाळेच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी बदलापुर शाखेचे अंनिस कार्यकर्ते प्रदीप बर्जे यांनी उत्कृष्टपणे पार पाडली. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यकार्यकारीणी सदस्य प्रा. प्रविण देशमुख, वैज्ञानिक जाणीवा विभागाच्या राज्य पदाधिकारी किरण ताई जाधव, सांस्कृतिक विभागाचे राज्य पदाधिकारी राजू कोळी, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष अशोक वानखडे, जिल्हा सचिव सचिन शिर्के, छाया शिर्के, आदींनी विशेष परिश्रम घेतले. हे शिबिर भोजन, चहा सहित विनामुल्य होते. अशाच प्रकारचे शिबिर पुन्हा लवकरच घेण्यात यावे, अशी मागणी आता इतर कार्यकर्यांकडून होत आहे हेच या कार्यक्रमाचे यश आहे.