विकत मिळते त्याची किंमत असते, प्रसादाने मिळते ते अनमोल असते – बाबा महाराज सातारकर

विकत मिळते त्याची किंमत असते, प्रसादाने मिळते ते अनमोल असते - बाबा महाराज सातारकर

पिंपरी (लोकमराठी ) : बाजारात विकत मिळते त्याची किंमत असते, पण प्रभुकृपेने, प्रसादाने जे मिळते ते अनमोल असते. ज्या प्रमाणे अंगठीची किंमत आहे, परंतू बोटाची किंमत अनमोल आहे. कर्माने मिळविलेली संपत्ती, धन, वैभव, प्रतिष्ठा अहंकाराने लुप्त होते. संसारिक जीवन जगणारा मानव मद्‌, मत्सर आणि अहंकाराने भरलेला असतो. त्याला ‘जागविण्याचे काम’ संतांचे आहे. सुखाच्या शोधात जीवन व्यथित करणारा माणूस संतांच्या सान्निध्यात आल्यास त्याला शाश्वत सुख, शांती आणि आनंद मिळेल. आपले व आपल्या मुलांचे जीवन सार्थक होण्यासाठी व जीवनात परिवर्तन होण्यासाठी त्यांना संतांच्या सान्निध्यात आणावे, असे ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांनी सांगितले.

आकुर्डीतील श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट व समस्त भजनी मंडळांच्या वतीने चंपाषष्ठीनिमित्त आकुर्डीतील खंडोबा मंदिरात बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन आयोजित करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ उद्योजक व्हि.एस. काळभोर यांचे हस्ते बाबा महाराज सातारकर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पंचक्रोषीतील हजारो भक्त भाविकांनी खंडोबाचे दर्शन घेतले. मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. प्रसाद म्हणून वाग्यांचे भरीत व भाकरीचे वाटप करण्यात आले. बंधू-भगिनी उपस्थित होते.

ह.भ.प.बाबा महाराज सातारकर म्हणाले की, पालक आपल्या मुलांना वैद्यकीय, अभियांत्रिकी, कायद्याचे व शक्य तेवढे भौतिक शिक्षण देण्याचे प्रयत्न करतात. त्यातून पैसे कमवून सुख मिळण्यासाठी साधने विकत घेतात, संपत्तीचा संचय करतात. पालक पैसे कमविण्याचे सांगतात तर शिक्षक भौतिक शिक्षण देतात; मात्र जीवन कसे जगावे याचे शिक्षण संत देतात. सुखाचा संबंध मेंदूशी आहे तर शांतीचा संबंध हृदयाशी आहे. धनसंचयाने सुख आले तरी मनातील लालसा कमी होत नाही. त्यासाठी मन आणि इंद्रियांवर ताबा मिळविण्याचा मार्ग तसेच शाश्वत सुख, आनंद आणि शांती प्रभू विठ्ठल नामाने मिळते, असेहि ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांनी सांगितले.