कुजबुज : एक संशयात्मा

कुजबुज : एक संशयात्मा

कुजबुज : एक संशयात्मा
जेट जगदीश

गेल्या सहा वर्षांपासून देशात नरेंद्र मोदी यांचे भाजप सरकार आहे. ते आल्यापासूनचे अनेक विषय हे हिंदू आणि मुस्लिम अशी विभागणी करणारे आहेत. जसे की, गोहत्या आणि गोमासाच्या नावाखाली झुंडीने हत्या करणे, वंदे मातरम, भारतमाताकी जय म्हणायला बळजबरी करणे, अयोध्येत राम मंदिर उभारणे, काश्मीरचा वेगळा दर्जा रद्द करणे, इत्यादी…. अशी विषयांची यादी बरीच आहे. त्यात भरीस भर म्हणून काश्मिरी लोक मुसलमान आहेत त्यामुळे ते देशद्रोहीपणा करीत आहेत असे तर आजकाल आपले अनेक टीव्हीवाले आणि काही पेपरवालेही सूचित करत असतात.

सर्वसामान्य हिंदू लोकांना मुस्लिम समाज, कुटुंबे यांची जवळपास काहीही माहिती नाही. त्यांचे राहणे-वागणे-बोलणे, खाणे-पिणे, भाषा, व्यवसाय, सण-समारंभ, धर्म, धार्मिकता याबाबत त्यांच्या डोळ्यापुढे वा कानावर कोणतेही दखलपात्र (authentic) तपशील येत नाहीत. त्यातल्या त्यात गर्दीमध्ये येता-जाता दिसणाऱ्या बुरख्यातील मुली-महिला आणि मशिदीमधून कानावर पडणारी बांग यातूनच त्यांना मुस्लिमांचे अस्तित्व जाणवत असते. या वरवरच्या गोष्टी पाहून सर्वसाधारणपणे आज हिंदू मन मुस्लिमांप्रति संशयी आणि द्वेषपूर्ण असतं. मुस्लिमांबद्दल वास्तव विचार करण्यास ते सहसा तयार होत नाही. मुस्लिम समुदायाबद्दल त्यांच्या मनात एक अढी असते.

अशाप्रकारे एकीकडे मुसलमान समाजाबद्दल त्यांच्याशी कधीही संबंध न ठेवल्यामुळे मुस्लिम समाजाची काहीही माहीती नसणे, तर दुसरीकडे मुसलमान हा मागास, शत्रू, खलनायक, देशद्रोही, इत्यादी सर्व काही असल्याचे येता जाता ऐकायला व पाहायला मिळणे; असे विष आजच्या हिंदू तरुणांच्या अंगात भिनवले गेले आहे. त्यांच्या मेंदूत सतत मुस्लिमांविरुद्ध नकारात्मक गोष्टी भरल्यामुळे सामान्य हिंदू जनात मुस्लिमांबद्दल भयगंड निर्माण झाला आहे. परिणाम जशी आपल्याला पालीबद्दल घृणा निर्माण होते तशी या मुस्लीमांबद्दल किळस वाटते. धर्मान्ध हिंदुत्ववाद्यांनी आपला राजकीय अजेंडा पुढे रेटण्यासाठी आजच्या तरुणांना अशा धोकादायक वळणावर आणून ठेवले आहे. हिंदू-मुस्लिम शेकडो वर्षे या भारतात एकत्र रहात आहेत; मग या सहा वर्षातच त्यांना आपसात अविश्वास… अस्वस्थ का वाटू लागले आहे याचा विचार करायची वेळ आली आहे, असे नाही वाटत?