Covid-19 : पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना व्हायरसमुळे ४७ वर्षीय रुग्णाचा मृत्यू, शहरातील पहिला बळी

Covid-19 : पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना व्हायरसमुळे ४७ वर्षीय रुग्णाचा मृत्यू, शहरातील पहिला बळी
संग्रहित छायाचित्र

लोकमराठी न्यूज नेटवर्क

पिंपरी (पुणे), ता. १२ : पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयात कोरोनाची लागण झालेल्या एका ४७ वर्षाच्या पुरूषाचा उपचारादरम्यान रविवारी (ता. 12) मृत्यू झाला. कोरोना विषाणूमुळे हा पहिलाच बळी असून मृत व्यक्ती सुरक्षारक्षकाचे काम करत होता.

मृत्यू झालेल्या या व्यक्तीला त्रास होऊ लागल्यामुळे पाच दिवसांपूर्वी तो चिंचवड येथील महापालिकेच्या एका दवाखान्यात गेला होता. त्याला उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात पाठविण्यात आले होते. त्याच्या घशाचे द्रव्य घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. ९ एप्रिल रोजी तपासणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

उपचारादरम्यान त्याची प्रकृती खालावल्याने अखेर रविवारी त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, त्याच्या संपर्कात आलेल्या आठ जणांच्या घशाचे द्रव्य तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. मृत व्यक्ती हिंजवडीत सुरक्षा रक्षकाचे काम करत होता. त्याला कोणाच्या संपर्कात आल्याने कोरोनाची लागण झाली हे मात्र अद्यापपर्यंत स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान पिंपरी-चिंचवडमधील ३१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील १२ रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी गेले आहेत.