पुरुष मर्द आणि स्त्री नाजूक? — जेट जगदीश

पुरुष मर्द आणि स्त्री नाजूक? — जेट जगदीश 

‘हर हर महादेव’ हा (Har Har Mahadev 2022) चित्रपट म्हणजे एकूण सगळा विनोदच आहे. पण ते तसेच सोडून देऊन चालणार नाही. कारण या चित्रपटाचे निर्माते हे हिंदुत्ववादाने भारलेले धर्मांध आहेत आणि नवीन पिढीमध्ये आपल्या सोयीचा इतिहास लिहून चुकीचा संस्कार रुजवण्यात हातभार लावणारे आहेत. त्यामुळे त्यांना योग्य वेळी धडा शिकवलाच पाहिजे.

पण या चित्रपटात मांजरेकरचा मुलगा कोवळा दिसतो म्हणून त्याची खिल्ली उडवणे मात्र योग्य नाही. कारण ‘पुरुष म्हणजे मर्द’ अशी जी एकूण पुरुषाची प्रतिमा तयार केली गेलेली आहे तीच मुळात चुकीची आहे. आज आपण अशा चुकीच्या कल्पनांमुळे कोवळ्या दिसणाऱ्या पुरुषाची खिल्ली उडवतो, हे तर त्याहूनही असंस्कृतपणाचे लक्षण आहे. एकूण जगभर पुरुषसत्ताक अवस्था घट्ट रुजवताना स्त्री आणि पुरुषांना विशिष्ट चौकटीत अडकवले गेले आहे. कारण माणूस जेव्हा शेती करू लागला आणि एका जागी स्थिर झाला तेव्हा स्त्रीला बाळंतपणामुळे घरात काही महिने डांबून घ्यावे लागले; तर पुरुषाला बाहेरील जगण्याशी झगडावे लागले आणि या काळात स्त्रीचे पालनपोषण करण्याची जबाबदारी घ्यावी लागली. यातून पुरुषी वर्चस्व वाढत गेले. पुरुषाच्या मर्दपणाच्या आणि स्त्रीच्या नाजूकपणाच्या कल्पना ठाकूनठोकून लोकांच्या डोक्यात घट्ट रुजवल्या गेल्या.

शेकडो वर्षे हे असे चालत आल्यामुळे 21 व्या शतकात स्त्री-पुरुष समानता रुजत आलेली असतानासुद्धा या कल्पनांना मात्र अजूनही पुरेसा धक्का लागलेला नाही. आज असे कुठलेही क्षेत्र नाही की जे स्त्रियांनी काबीज केलेले नाही. पुरुषांची म्हणून जी जी क्षेत्रे आजवर गणली गेली त्या सगळ्या क्षेत्रात स्त्रियांना संधी मिळाल्याबरोबर त्यांनी ती काबीज केली. तरीही आज आपण ‘स्त्री ही नाजूकच असते आणि पुरुष हा मर्दानगीचा पुतळा असतो’ असे समजतो याला काय म्हणावे? पण काही सजग माणसे या सगळ्या बंदिस्त चौकटीतून बाहेर पडत आहेत. तरीही बव्हंशी समाजाची अवस्था मात्र डबक्यात साचलेल्या दूषित पाण्यासारखी रोगट झालेली आहे, हेही तितकेच खरे.

त्यावर उपाय म्हणून चुकीच्या रूजलेल्या घट्ट कल्पनांचा प्रतिवाद करून त्यांना छेद देत स्त्री-पुरुष समानतेचा विचार मोठ्याप्रमाणात प्रसारीत व्हायला हवेत. निदान काही लोक विचार तरी करू लागतील आणि चुकीच्या कल्पनांना मोडीत काढण्यासाठी प्रयत्न करतील. तेव्हा रूढ चौकटींना मोडणाऱ्या आणि स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या माणसांनी तरी या कल्पना त्यागून स्वच्छ मनाने स्त्री-पुरुष समानता स्वीकारायला काय हरकत आहे?