वीज बिल थकल्याने काळेवाडीतील जामा मशीदीचा वीजपुरवठा बंद | महावितरणविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

वीज बिल थकल्याने काळेवाडीतील जामा मशीदीचा वीजपुरवठा बंद | महावितरणविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

पिंपरी : मागील दोन महिन्यांचे १८ हजार रूपये बिल थकल्याने महावितरणने काळेवाडी-कोकणे नगरमधील जामा मशीदीचा वीज पुरवठा बंद करून वीज मीटर काढून नेले. मस्जिद ही चॅरिटेबल ट्रस्ट असून भाविकांच्या वर्गणीतून मशीदीचा सर्व खर्च केला जातो. मात्र, धार्मिक स्थळ बंद असल्याने ट्रस्टचे उत्पन्न बंद आहे. परिणामी ट्रस्ट आर्थिक संकटाचा सामना करत आहे. परंतू या बाबीचा विचार न करता महावितरणने वीज पुरवठा बंद केला. त्यामुळे नागरिकांडून निषेध व्यक्त केला जात असून सामाजिक कार्यकर्ते शेख इरफान अब्दुल रहीम यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, कोरोना महामारीमुळे मागील सुमारे दीड वर्षांपासून काळेवाडीतील जमा मशीद बंद आहे. मशीद ही चॅरिटेबल ट्रस्ट आहे. भाविक येथे नमाज पठाणसाठी येतात व त्यावेळी ते जी दहा-वीस रुपये वर्गणी देतात. या वर्गणीतून मौलाना, सहायक मौलाना व मेंटेनन्स खर्च, लाईट बिल या जमा निधीतून केले जाते. परंतु मागील दीड वर्षांपासून मस्जिद बंद असस्याने ट्रस्टला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.

त्यामुळे मागील दोन महिन्याचे १८ हजार रुपये वीज बिल ट्रस्ट भरू शकले नाही. समस्त समाज या कारवाईचा निषेध करतो. आणि आपण न्याय देताल ही अपेक्षा करत आहेत.

वीज वापर केल्यास त्याचे बिल भरणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. थकलेल्या बिलाबाबत अनेकदा तोंडी सांगितले. मात्र, बिल भरले गेले नाही. त्यामुळे नियमानुसार कारवाई करण्यात आली आहे. – शितल मेशराम, उपअभियंता, महावितरण