दोन किलो सोने चोरीतील आरोपी कर्जत व पुणे पोलिसांनी केले जेरबंद

दोन किलो सोने चोरीतील आरोपी कर्जत व पुणे पोलिसांनी केले जेरबंद

कर्जत (प्रतिनिधी) : दोन किलो सोने चोरीतील आरोपी कर्जत आणि पुणे पोलिसांकडून संयुक्त कारवाईत जेरबंद करण्यात आले असून त्यांचेकडून एक किलो सोने पोलिसांनी हस्तगत केले आहे.

मारुती राजाराम पिटेकर (वय ४५ वर्षे, रा. माळंगी, ता. कर्जत) व आनंता लक्ष्मण धांडे (वय ४० वर्षे, रा. वालवड, ता.कर्जत, जि. अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी हे राजगड पोलीस ठाणे व पुणे ग्रामीण हद्दितुन २० ऑक्टोबर रोजी रात्री प्रवास करत होते. त्यावेळी कोल्हापूर ते खेड शिवापूर टोल नाका दरम्यान तीन अनोळखी व्यक्तींनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम असलेली ८१ लाख २४ हजार किमतीचे २११० ग्रॅम वजनाचे १८ कॅरेटचे सोन्याचे वेगवेगळे दागिने १८ लाख रोख रक्कम असे एकूण ९९ लाख २४ हजार रूपयांचा ऐवज असलेली बॅग चोरी केली.

याबाबत राजगड पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण येथे फिर्याद दाखल करण्यात आली. सदर गुन्ह्यातील संशयीत फरारी आरोपी कर्जत पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याची माहिती कर्जत पोलिसांना मिळाली.

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सपोनि सतीश गावित, सुरेश माने, पोलीस जवान शाम जाधव, जालिंदर पाचपुते, सुनील खैरे, गोवर्धन कदम आणि राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील, सपोनि प्रवीण पोरे व राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस जवान असे पहाटे पाच वाजता मोठ्या शिताफीने माळंगी, तालुका कर्जत येथून संयुक्त कारवाई करुन यातील वरील नमूद आरोपी यांना ताब्यात घेवून कर्जत पोलीस ठाण्यात आणले.

यातील आरोपी यांना कसून विचारपूस करुन गुन्ह्यातील जवळपास एक किलो सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रवीण पोरे करत आहेत.

पुणे पोलीस सदर प्रकरणात खोलवर तपास करून आणखी कोण कोण सामील आहेत. याबाबत सखोल तपास करून आरोपी अटक करणार आहेत. सदर आरोपींवर कर्नाटक तसेच महाराष्ट्रातील कराड शहर, नंदुरबार व इतर ठिकाणी गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सपोनि सतीश गावित, सुरेश माने, पोलीस जवान शाम जाधव, जालिंदर पाचपुते, सुनील खैरे, गोवर्धन कदम, जयश्री गायकवाड आणि राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील, सपोनि प्रमोद पोरे, उपनिरीक्षक लोणकर व राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस जवान नाना मदने, योगेश राजवडे, महेश खरात, सोमा जाधव, भोर यांनी केली.