हॉलिवूडची गर्भश्रीमंत अभिनेत्री झाली फकीर

हॉलिवूडची गर्भश्रीमंत अभिनेत्री झाली फकीर
Kendall Jenner

हॉट व ग्लॅमरस अवतारात बागडणाऱ्या केंडल जेनरची कारकीर्द समाज माध्यमातून सुरू झाली.

‘दैव देते आणि कर्म नेते’ ही म्हण अभिनेत्री केंडल जेनरच्या बाबतीत शब्दश: खरी ठरते. भूतकाळात अनेकांचे केलेले अपमान, पैशांचा दाखवलेला माज आणि उद्धटपणा यामुळे तिच्या नशिबाची चक्रे एकाएकी उलटी फिरू लागली. परिणामी अन्न, वस्त्र व महागडय़ा सौंदर्य प्रसाधनांची गरज भागवण्यासाठी मारामारी सुरू असतानाच आता तिच्या डोक्यावरील निवाराही गेला आहे. गेली दोन वर्ष केंडल प्रियकर बेन सिमन्सबरोबर राहात होती. परंतु अंतर्गत मतभेदांमुळे सुरळीत सुरू असलेला संसार तिने एकाएकी मोडला. आणि तिथूनच तिच्या उतरत्या प्रवासाची सुरुवात झाली.

ब्रेकअप केल्यानंतर ती लॉस एन्जेलिसमधील उच्चभ्रू भगात एका भाडय़ाच्या बंगल्यात राहू लागली. सुरुवातीचा काळ बरा गेला; परंतु महागडय़ा जीवनशैलीची चटक लागलेल्या केंडलची आर्थिक शिदोरी हळूहळू कमी होऊ लागली. तसेच वादग्रस्त पार्श्वभूमीमुळे तिला मिळणारी कामेही आता जवळपास बंद झाली आहेत. त्यामुळे तिच्याकडे आता इतकी आर्थिक टंचाई आहे की बंगल्याचे भाडे देण्यासाठीही तिच्याकडे पैसे उरलेले नाहीत. परिणामी घर मालकाने तिला अक्षरश: घरातून बाहेर काढले. त्यामुळे कालपर्यंत हवेत मिरवणाऱ्या केंडलचा आता ‘अर्श से फर्श तक ’असा प्रवास सुरू झाला आहे असे म्हणता येईल.

हॉट व ग्लॅमरस अवतारात बागडणाऱ्या केंडल जेनरची कारकीर्द समाज माध्यमातून सुरू झाली. बोल्ड छायाचित्रे व वादग्रस्त विधानांच्या जोरावर केंडलने मोठा चाहता वर्ग गोळा केला. परिणामी तथाकथित लोकप्रियतेच्या जोरावर सर्वात प्रथम तिला ‘अमेरिकन चिअरलीडर’ नियतकालिकाच्या कव्हर पेजवर झळकण्याची संधी मिळाली. त्यानंतर सामान्य जीवन व्यतीत करणाऱ्या केंडलचे आयुष्य एकाएकी बदलले. तिची ‘अमेरिकन चिअरलीडर’मधील छायाचित्रे इतकी गाजली की सुपरस्टार जस्टिन बीबरदेखील तिच्या प्रेमात पडला. त्यानंतर तिने अनेक मोठय़ा ब्रँडच्या जाहिराती केल्या. सौंदर्याला अभिनयाचा शाप असतो असे आल्फ्रेड हिचकॉकने म्हटले होते. केंडल जेनर या वाक्यात जशीच्या तशी बसते. परंतु अभिनयातील ‘अ’ देखील येत नसताना केवळ प्रसिद्धीच्या जोरावर ती मालिकांमध्ये झळकू लागली. कालपर्यंत कोणाच्या ध्यानीमनी नसलेली केंडल स्टाइल आयकॉन बनली. तिच्या यशाचा आलेख हळूहळू वरती जात होता. परंतु तेच यश नंतर तिच्या डोक्यात गेले. आणि तिचा उद्धटपणा वाढला. येता-जाता ती पत्रकार, दिग्दर्शक, चाहते सर्वाचाच अपमान करू लागली. पाच वर्षांच्या कारकीर्दीत तिने अनेक प्रियकर बदलले. या सर्वामुळे तिने कमावलेले नाव गमवण्यास सुरुवात केली. तिच्या उद्दामपणाचा उच्चतम बिंदू म्हणजे आपला आर्थिक कर्ताधर्ता बेन सिमन्सबरोबर तिने केलेला ब्रेकअप होय. या प्रकारामुळे आता शेवटी तिच्यावर अक्षरश: ‘कुणी घर देता का घर’ म्हणायची वेळ आली आहे.