रिसोड: प्रतिनिधी शंकर सदार/ तालुक्यातील गेल्या तीन दिवसापासून सुरु असलेल्या संतधार पावसामुळे खडकी सदार गावच्या नाल्याला आलेल्या पुरामुळे गावाचा संपर्क तुटला. त्यामुळे गावातील शाळा बंद असून, रुग्णांनाही उपचाराअभावी त्रास सहन करण्याची वेळ आली आहे. गावाच्या नाल्यावरील पुलाचा प्रश्न गंभीर आहे. मात्र या प्रश्नाकडे लक्ष दिल्या जात नाही. त्यामुळे गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
रिसोड तालुक्यातील खडकी सदार हे गाव साधारण १८०० ते २००० लोकसंख्येचे गाव आहे. गावात जाणारा मुख्य रस्ता हा नाल्यावरुन जातो. गत तीन दिवसापासून सुरु असलेल्या संतधार पावसाने बुधवार (दि.२१) मध्यरात्रीपासून पुर आला आहे. तो अजून कायम आहे. मुख्य रहदारीचा रस्ता बंद झाल्यामुळे गावाचा इतरांशी असलेला संपर्क तुटला आहे. नाल्याला आलेल्या पुरामुळे रुग्णांना गावाबाहेर जाणे शक्य नाही. त्यामुळे त्याच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच बाहेरुन येणाऱ्याना सुद्धा गावात प्रवेश करता येत नाही.
सध्या गावात कोणी आजारी पडले तर त्यांच्यावर उपचार करण्यासाठी शहरा पर्यंत जाणाचा कुठलाच मार्ग शिल्लक नसल्याने गावात जिवीत हानी होण्याची शक्यता आहे. याकडे प्रतिनीधी लक्ष देण्याचे गरज असल्याचे बोलले जाते.