मुंबई (लोकमराठी) : राज्यात नव्याने स्थापन होत असलेले शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे महाशिवआघाडीचे सरकार शरद पवार यांच्यामुळे पाच वर्षे टिकेल, असा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) नेते रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.
शिवसेनेसोबत सत्तेत जाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये बुधवारी रात्री झालेल्या बैठकीत औपचारिक सहमती झाली. यामुळे महाराष्ट्रात सरकार अस्तित्वात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा उद्या (शुक्रवार) शिवसेना आमदारांच्या बैठकीनंतर होण्याची शक्यता आहे. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या आठवले यांनी हे वक्तव्य केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना आठवले म्हणाले, की शरद पवार असल्यामुळे हे सरकार पाच वर्षे टिकू शकेल. वैचारिक मतभेद होणार नाही, हे ते पाहतील. अडीच वर्षे शिवसेनेला आणि अडीच वर्षे राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळेल अशी चर्चा सुरु आहे, पाहूया काय असेल. जर, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनायचंय हे आधी माहीत असतं तर भाजपने पाठिंबा दिला असता. महायुतीचं सरकार यावे यासाठी मी प्रयत्न केले. शिवसेना मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही राहिली. पण भाजप ऐकत नाही हे पाहून त्यांना सत्तेबाहेर ठेवायचं हे शिवसेनेने ठरवले. काँग्रेसकडून शिवसेनाला पाठिंबा मिळणार नाही असं वाटलं होतं, पण आता त्यांनी पाठिंबा दिला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनतील त्यांना शुभेच्छा. त्यांनी जनतेची कामे करावी.