मराठी भाषा ही प्रवाही भाषा आहे – डॉ. शिवलिंग मेनकुदळे

मराठी भाषा ही प्रवाही भाषा आहे - डॉ. शिवलिंग मेनकुदळे

हडपसर (प्रतिनिधी) : मराठी भाषेला लोकसंस्कृती व लोक व्यवहाराचे कवच आहे, तोपर्यंत कोणताही धोका नाही. मराठी भाषा ही प्रवाही भाषा आहे. ती लोक व्यवहाराबरोबर साहित्य व्यवहारातही असावी. कुसुमाग्रजांचे व्यक्तिमत्व प्रतिभासंपन्न होते. त्यांच्या साहित्यातील वैचारिकता समाजाला दिशा देणारी आहे. भाषा हा मानवी जगण्याचा श्वास आहे. त्यामुळेच आपल्या जीवनात गतिमानता आली आहे. मराठी भाषा ही ज्ञानभाषा झाली पाहिजे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. मराठी शाळा बंद पडत आहेत, ही धोक्याची सूचना आहे. इतर भाषा शिकूया पण आपण आपल्या मराठी भाषेचा गौरव केला पाहिजे. लेखकांनी लेखन करून मराठी भाषा समृद्ध केली आहे. आपणही मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करुया, असे विचार रयत शिक्षण संस्थेचे ऑडिटर प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी व्यक्त केले.

ते एस. एम. जोशी कॉलेजमध्ये मराठी भाषा गौरव दिन समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मराठी विभाग, जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन व वैश्विक कला पर्यावरण पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी नेदरलॅंडचे सुप्रसिद्ध कवी व चित्रकार भास्कर हांडे यांनी मराठी भाषा गौरव दिन समारंभासाठी शुभेच्छा दिल्या.

मराठी भाषा ही प्रवाही भाषा आहे - डॉ. शिवलिंग मेनकुदळे

अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे होते. ते म्हणाले की, मराठी भाषेची समृद्ध अशी परंपरा आहे. मराठी भाषेतील काही शब्द लोप पावत चालले आहे त्याचे जतन व्हायला पाहिजे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हायला पाहिजे. असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. राजेंद्र ठाकरे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. अतुल चौरे यांनी केले.

सूत्रसंचालन प्रा. पुनम तडके यांनी तर आभार प्रा. प्रांजली शहाणे यांनी मानले. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मराठी विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कोशवाड्मय व ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे संयोजन ग्रंथपाल प्रा. शोभा कोरडे यांनी केले. या कार्यक्रमाला उपप्राचार्य प्रा. संजय जगताप, उपप्राचार्य प्रा. संजय जडे, आय. क्यु .ए. सी.चे प्रमुख डॉ.किशोर काकडे, डॉ नम्रता मेस्त्री, डॉ. संदीप वाकडे, प्रा. शुभम तांगडे व सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, प्रशासकीय सेवक उपस्थित होते.