महाबळेश्वर : अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या शतकवीर-आधारस्तंभ पुरस्कार वितरण सोहळा पुस्तकांचे गांव भिलार-महाबळेश्वर येथे संपन्न झाला त्यावेळी पद्मश्री अरविंद गुप्ता यांनी आपले विचार परखडपणे मांडले
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचा ‘शतकवीर’ आणि ‘आधारस्तंभ’ पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटन 26 तारखेला दुपारी तीन वाजता पुस्तकाचे गाव भिलार येथील हिलरेंज शिक्षण संस्थेच्या भव्य मैदानावर प्रसिद्ध अभिनेता किरण माने यांच्या हस्ते झाले.
दुसऱ्या दिवशी 27 तारखेला सकाळी 10 वाजता प्रत्यक्ष पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथील “आयुका” या विज्ञान संस्थेतील निवृत्त प्राध्यापक शास्त्रज्ञ व मुलांसाठी शेकडो वैज्ञानिक खेळणी बनवत, पुस्तके लिहीत त्यातून लहान मुलांच्यात वैज्ञानिक संकल्पना रुजविण्याचे पर्यायाने विज्ञान प्रसाराचे काम करणारे पद्मश्री अरविंद गुप्ता यांच्या हस्ते झाले.
कोणत्याही धमक्याना न घाबरता सनातन्याच्या कारवाया बेडरपणे उघडकीस आणणाऱ्या प्रसिद्ध पत्रकार अलका धुपकर यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. शैलाताई दाभोलकर यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्रातील गोंदियापासून बेळगावपर्यंत विविध जिल्ह्यातून आलेल्या शतकवीरांना अरविंद गुप्ता यांच्या हस्ते तर आधारस्तंभाना अलका धुपकर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येऊन गौरवण्यात आले.
या पुरस्कार सोहळ्यात ठाणे जिल्ह्यातील प्रा. प्रवीण देशमुख व गणेश चिंचोले यांना शतकवीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर डॉ. श्यामकांत जाधव, प्रसाद खुळे, वंदनाताई शिंदे, डी. जे. वाघमारे, डॉ. दुशंत भादलीकर यांना आधारस्तंभ पुरस्काराने गौरविण्यात आले.
शतकवीर कार्यकर्त्यांना पुरस्कार देऊन झाल्यावर केलेल्या आपल्या भाषणात अरविंद गुप्ता यांनी सुरुवातीलाच या पुरस्कार वितरणाच्या सोहळ्यात सहभागी होणे हे खूपच गौरवास्पद वाटत असल्याचे सांगितले. आपल्या पूर्वजानी सांगितले, आपल्या गुरुने सांगितले, आपल्या ग्रंथांनी सांगितले म्हणून तुम्ही आंधळेपणे मान्य करू नका तर त्याला प्रश्न विचारा, चिकित्सा करा आणि सत्य वाटले, जनहिताचे वाटले तरच मान्य करा हे दीड हजार वर्षांपूर्वीचे बुद्धाचे वचन सांगत ते म्हणाले, “सभोवार बुवाबाजीचा प्रचंड बाजार फुललेला आहे, त्याला पूरक असणारी ‘व्हाट्स अप युनिव्हर्सिटी’, त्यात अडकलेला युवक वर्ग, त्याला पाठिंबा देणारे सत्ताधारी या सगळ्यांमुळे आपल्या समाजाला अंध:कारात ढकलेले जात आहे अशा वेळेस कोणी कितीही मोठा सत्ताधीश असो, महंत असो त्याला प्रश्न विचारण्याचा आपला हक्क अबाधित ठेवला पाहिजे. त्यासाठी मुलांच्यामधील, युवकांच्यामधील वैज्ञानिक वृत्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे आणि हे प्रयत्न शाळा कॉलेजातून करणे जरुरीचे आहे कारण ही शाळा कॉलेजची जमीन फारच कोरडी आहे त्यात बी पेरायचे तर ती सुपीक बनविली पाहिजे आणि त्यासाठी शक्य त्याने न घाबरता दररोज चिमूटभर माती त्या जमिनीवर टाकली पाहिजे तरच ते बी रूजेल आणि त्या जमिनीतून काहीतरी उगवेल.आणि ही एक चिमूट माती टाकण्याचे काम तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांसह आज अनेकजण करत आहेत.” त्या सर्वांना “अनसंग हिरोज” च्या पदवीने गौरवत अरविद गुप्ता यांनी आपले भाषण संपविले.
आधारस्तंभ कार्यकर्त्यांना पुरस्कार दिल्यावर केलेल्या आपल्या भाषणात प्रसिद्ध पत्रकार अलका धुपकर यांनी आजचा तरुण वर्ग सोशल मिडियावरील फेसबुक, व्हाट्स अप, इनस्टाग्राम यांच्या विळख्यात पूर्णत: सापडला आहे. त्यांच्याबरोबरच धोरण ठरवणारा, उच्चभ्रू वर्ग यांचा आजच्या सामाजिक वास्तवाशी संबंधच तुटलेला आहे. अशा वर्गाशी, लोकांशी चळवळ कशी जोडून घेणार आहे? असा प्रश्न उपस्थित करत जर आपण यात कमी पडलो तर पुरोगामी, विवेकवादी, धर्मनिरपेक्ष या मूल्यांना मानणाऱ्या भारतीयत्वाच्या संकल्पनेला विरोध असणाऱ्यांचे फावणार आहे याचे उदाहरण देताना त्या म्हणाल्या, “ सनातन्यानी धार्मिक आचरण म्हणजे काय? अशी पुस्तके प्रसिद्ध केली आहेत व ती मध्य प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांना ते भेट देत आहेत. मोठ्या वर्तमानपत्रातून त्याची माहिती येत आहे. ही पुस्तके शाळा कॉलेजातून वाटली जावीत अशा कल्पना हे प्रशासकीय अधिकारी व्यक्त करू लागले आहेत.” व ते आता हिंदू धर्मा आधारित राष्ट्राची स्वप्ने पाहू लागले आहेत व हे फार मोठे आव्हान आपल्यासमोर आहे व हे आव्हान आपण कसे पेलणार? त्यासाठी आपण आपले वर्तुळ भेदून बाहेर आले पाहिजे व कौटुंबिक, सामाजिक पातळ्यांवर आधुनिक आयुधे वापरत संघर्ष करायला पाहिजे हे सांगताना त्या म्हणाल्या,“ ही लढाई एका दिवसाची नाही किंवा येणाऱ्या निडणुकांपुरतीही नाही, लढाईचे रण तर खूप मोठे आहे, हे एक ‘कल्चरल वॉर’ आहे.” त्यामुळे अंधश्रद्धेशी लढत असताना या सगळ्याकडे तुम्ही कानाडोळा करणार नाही असा आशावाद व्यक्त करत त्यांनी आपले भाषण संपविले.
त्यानंतर सर्व पुरस्कार्थीच्या वतीने बोलताना वर्गणीदार करताना व देणग्या, जाहिराती गोळा करताना येणाऱ्या अनुभवांचे मार्मिक वर्णन भोर अंनिसचे कार्यकर्ते डॉ. अरुण बुरांडे यांनी केले. अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र ट्रस्टचे सचिव दीपक गिरमे यांचेही समयोचित भाषण झाले.
शेवटी आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ.शैलाताई दाभोलकर अंकाचे वर्गणीदार करणे हे किती अवघड काम आहे याबद्दल स्वत:चा अनुभव सांगत शतकवीरांचे अभिनंदन केले व यापुढे हे अवघड काम सातत्याने करत राहू असा निश्चय येथून जाताना करा असे आवाहन त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना केले.
पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रास्ताविक वार्तापत्रांचे संपादक राजीव देशपांडे यांनी केले तर पाहूण्यांची ओळख वार्तापत्राच्या सहसंपादक मुक्ता दाभोलकर यांनी करून दिली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत पोतदार, उदय चव्हाण यांनी केले. तर आभार प्रदर्शन फारूक गवंडी यांनी केले.