- वीजबिलांची छपाई आणि वितरण बंद; मोबाइल क्रमांकाची नोंदणी
पुणे (लोकमराठी) : करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात सध्या टाळेबंदी सुरू असल्याने २३ मार्चपासून महावितरणने वीजबिलांची छपाई आणि वितरण बंद केले असले, तरी ऑनलाइन पद्धतीने वीजबिल भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यादृष्टीने ग्राहकाला एसएमएसच्या माध्यमातून वीजबिल मिळण्यासाठी महावितरणकडे मोबाइल क्रमांकाची नोंदणी आवश्यक आहे.
पुणे परिमंडल अंतर्गत पुणे शहर, पिंपरी- चिंचवड शहर तसेच पुणे ग्रामीणमधील मुळशी, वेल्हे, मावळ, जुन्नर, आंबेगाव आणि खेड तालुक्यांत कृषी, अकृषक वर्गवारीतील २७ लाख ८७ हजार २०४ (९०.४७ टक्के) वीजग्राहकांनी महावितरणकडे ग्राहक क्रमांकासोबत त्यांच्या मोबाइल क्रमांकाची नोंदणी केली आहे. टाळेबंदीमध्ये या ग्राहकांना वीजबिलांची माहिती ‘एसएमएस’द्वारे देण्यात येत आहेत.
पुणे शहरामधील कोथरूड, शिवाजीनगर, रास्तापेठ, नगररोड, पद्मावती, पर्वती, बंडगार्डन या महावितरणच्या विभागांमधील १४ लाख ८८ हजार २११ (८९.८२ टक्के) ग्राहकांनी, पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी आणि पिंपरी विभागातील ६ लाख १५ हजार (९०.८६ ) ग्राहकांनी तसेच पुणे ग्रामीण मंडल अंतर्गत मुळशी, वेल्हे, मावळ, जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्यांतील ६ लाख ८३ हजार ९६८ वीजग्राहकांनी मोबाइल क्रमांकाची नोंदणी केली आहे
पुणे परिमंडलमधील उर्वरित वीजग्राहकांनाही महावितरणच्या ९९३०३९९३०३ या क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे मोबाइल क्रमांकाची नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे. वीजग्राहकांनी नोंदणी करायच्या मोबाइल क्रमांकावरून ९९३०३९९३०३ क्रमांकावर स्टाट्स (स्पेस) (बारा अंकी ग्राहक क्रमांक) अशी माहिती टाईप करून ‘एसएमएस’ केल्यास मोबाइल क्रमांकाची नोंदणी होते. याशिवाय चोवीस तास सुरू असणाऱ्या कॉल सेंटरचे १९१२ किंवा १८००१०२३४३५ आणि १८००२३३३४३५ हे टोल फ्री क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आले आहेत.