मुंबई (लोकमराठी) : साताऱ्याचे खासदार उदयनराजेंच्या भेटी नंतर मुख्यमंत्र्यांकडून शिवेंद्रराजेंना भेटीचे निमंत्रण देण्यात आले असून शिवेंद्रराजे वर्षावर दाखल झाले आहेत. उदयनराजेंच्या उपद्रवाचे कारण देत काही दिवसांपूर्वी शिवेंद्रराजंनी राष्ट्रवादी काँग्रेसला राम-राम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता.
उदयनराजे आणि मुख्यमंत्री यांच्यात झालेल्या भेटीत उदयनराजेंच्या राजीनाम्यानंतर विधानसभा आणि लोकसभेची पोट निवडणूक एकत्रित घेण्याची मागणी उदयनराजेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे सांगण्यात येत आहे. उदयनराजेंचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीनही राजेंना गमावणार हे जवळपास निश्चित आहे.
दरम्यान, शिवेंद्रराजेंनी याआधीच भाजपमध्ये प्रवेश केला असून रामराजे नाईक निंबाळकरही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असल्याचे बोलेले जात आहे. वर्षावरील झालेल्या बैठकीनंतर उदयनराजे लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती मिळत आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या उपस्थितीत लवकरच राजेंचा भाजप प्रवेश होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. उदयनराजे लवकरच लोकसभेचा राजीनामा देणार आहेत.