सायबर सेक्युरिटी विषयावर राजर्षी शाहू महाविद्यालयात राष्ट्रीय कार्यशाळा

सायबर सेक्युरिटी विषयावर राजर्षी शाहू महाविद्यालयात राष्ट्रीय कार्यशाळा

ताथवडे (लोकमराठी) : कृत्रिम बुद्धिमत्ता व इंटरनेट ऑफ थिंग्समुळे पुढील पंधरा वर्षात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रचंड बदल होणार आहेत. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात इंटरनेटचा शिरकाव होत आहे. त्याचबरोबर सायबर गुन्ह्यांमध्येही वाढ होणार आहे. त्यामुळे या विश्वात स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने सजग रहावे. सायबर धोक्यापासून वाचण्यासाठी शिक्षकांनी सायबर सुरक्षादूत (अँम्बेसेडर) व्हावे, असे आवाहन सायबर सुरक्षा क्षेत्रातील तज्ञांकडून केले जाते.

राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयात, ताथवडे येथे सायबर सेक्युरिटी या विषयावर राष्ट्रीय पातळीवर एक आठवड्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळमध्ये विविध उद्योग क्षेत्रातील मान्यवरांचे प्रात्यक्षिक द्वारे मार्गदर्शन लाभत आहे. प्रस्तुत कार्यक्रमाचे उद्घाटन सायबर सेल पिंपरी चिंचवड चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक माननीय विवेक मुगळीकर यांच्या हस्ते झाले.आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी सायबर सेक्युरिटी चे महत्व या विषयावर प्रकाश टाकला.

पोलिस निरीक्षक म्हणून काम करत असताना सायबर गुन्ह्यांसंदर्भात त्यांना आलेले अनुभव आणि त्या अनुषंगाने नागरिकांनी घ्यावयाची दक्षता यासंदर्भात त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. भ्रमणध्वनी ते संगणक पर्यंत जेथे जेथे इंटरनेट वापरतात तेथे तेथे त्यांना धोका उद्भवतो. सायबर सेक्युरिटी म्हणजे याच धोक्यांची शक्यता विविध तंत्रज्ञानाने कमी करणे हे होय. सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन मदन मोहन मालवीय शिक्षक प्रशिक्षण योजनेअंतर्गत मानव संसाधन मंत्रालय, भारत शासन आणि कोल्हापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांसाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये ८० शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदविला आहे.

या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला ताथवडे संकुलाचे व्यवस्थापक डॉ. पी.पी. विटकर, प्राचार्य डॉ. आर. के. जैन, रवी सावंत सर, प्रा. सुधिर भिलारे सर, प्रा. अविनाश देवस्थळी सर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक डॉ. बी. डी. जाधव, विभागप्रमुख इलेक्ट्रॉनिक आणि टेलेकॉम्यूनिकेशन इंजिनिअरिंग आणि डॉ. पी. एम. घटे हे आहेत.

Actions

Selected media actions