भोसरीतील शीतलबाग पादचारी पुलाच्या कामात मोठा गैरव्यवहार

भोसरीतील शीतलबाग पादचारी पुलाच्या कामात मोठा गैरव्यवहार
  • पुलाचा खर्च ७१ लाखावरून थेट ७.५ कोटीपर्यंत
  • वाढलेल्या खर्चाची चौकशी करून दोषींवर कारवाईची अपना वतनची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पिंपरी (लोकमराठी) : पुणे-नाशिक महामार्गावरील भोसरी येथील शीतलबाग पादचारी पुलाचा खर्च ७१ लाखांवरून थेट ७.५ कोटीच्या वर गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी अपना वतन संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

अपना वतनचे अध्यक्ष सिद्दीक शेख यांना पिंपरी चिंचवड महापालिकेकडून प्राप्त माहिती अधिकारातील कागदपत्रानुसार हा प्रकार निदर्शनास आला असून त्यामध्ये राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे व दाबामुळे तसेच प्रशासकीय अधिकारी व ठेकेदारांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे दिसत आहे.

दरम्यान, शीतलबाग पादचारी पुलाच्या कामामध्ये गैरव्यवहार झाल्याबाबत भाजपचे शहराध्यक्ष व चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप तसेच माजी खासदार आढळराव पाटील यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी केली होती. यावरून शीतलबाग पादचारी पुलाच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाला असेल याला दुजोरा मिळतो.

असा झाला गैरव्यवहार

शीतलबाग पादचारी पूलच्या कामासाठी अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. त्याची अंदाजपत्रकीय रक्कम ७६ लाख९ हजार ५४९ इतकी होती. त्यापैकी ७१ लाख ५ हजार ८७ या रकमेस १ जून २०१२ रोजी तांत्रिक मान्यता घेण्यात आली. स्थायी समिती ठराव क्रमांक ३२७२ नुसार ९ एप्रिल २०१३ रोजी निविदा स्वीकृतीस मान्यता देऊन १३ मे २०१३ रोजी धनेश्वेर कन्स्ट्रक्शन यांना कामाचे आदेश देण्यात आले. त्यानंतर भोसरीतील (वार्ड क्रमांक ३४) नगरसदस्य यांच्या ९ जुलै २०१३ च्या पत्रानुसार डिझाईनचे कारण देऊन महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केवळ राजकीय अट्टाहासापोटी अधिकारी, ठेकेदार व राजकीय पुढाऱ्यांच्या संगनमताने शीतलबाग येथील पादचारी पुलाचा खर्च ७१ लाखांवरून ६ कोटींपर्यंत नेला. तसा महापालिका ठराव क्रमांक ४३५ (१८ जानेवारी २०१४) नुसार मान्यता घेतली व स्थायी समिती सभा ठराव क्रमांक १०१६७, (३० डिसेंबर २०१४) नुसार रक्कम ५ कोटी ५७ लाख ७७ हजार ३५७ च्या खर्चास मान्यता देऊन धनेश्वर कन्स्ट्रक्शन यांना ०१ जानेवारी २०१५ रोजी कामाचे आदेश देण्यात आले. एवढेच नव्हे तर पुन्हा डिझाईनचे कारण स्थायी समिती सभा ठराव क्रमांक १५२६८, (दि. १७ फेब्रुवारी २०१६) नुसार त्याच कामासाठी ७.५ कोटीची मान्यता देण्यात आली. यामुळे लक्षात येते कि, या कामामध्ये वेळोवेळी मोठ्या प्रमाणात फेरफार करण्यात आला आहे.

पादचारी पूलाची गरज होती का?

तसे पाहता या ठिकाणी फूट ओव्हर ब्रिजची गरज आहे काय, याबाबत स्थळपाहणी करून स्थानिक नागरिकांची मते विचारत घेऊन हा पादचारी पूल बांधणे आवश्यक होते. जनतेचा कर रूपी पैसे योग्य ठिकाणी जनतेच्या हितासाठी वापरणे गरजेचे होते. परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी या गोष्टींचा कसलाही विचार न करता केवळ जनतेच्या पैशावर डल्ला मारण्याच्या उद्देशानेच या कामाच्या खर्चामध्ये ४ ते ५ वेळा वाढ करण्यात आली.

तत्कालीन स्थायी समिती सभापती, स्थायी समिती सदस्य, पिंपरी चिंचवड महापालिकेचे शहर अभियंता, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता व ठेकेदार यांच्या संगनमताने जनतेच्या पैशाची उधळपट्टी करण्यात आलेली आहे. त्यामुळे या सर्व राजकीय पुढारी, संबंधित अधिकारी, ठेकेदार यांची चौकशी करून दोषींवर भ्रष्टाचार करून जनतेची फसवणूक केल्याबाबत फौजदारी गुन्हे दाखल करावेत. अशी मागणी अपना वतन संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात अली आहे.