पुणे : पिंपरी चिंचवड शहर आणि मावळ तालुक्याची तहान भागविणाऱ्या पवना धरणातून निघालेल्या पाण्यावर तेलासारखा तवंग दिसून येत आहे. पाण्यावर तरंग दिसत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ब्राह्मणोली, कोथर्न, येळसे, कडधे या भागातुन जाणाऱ्या पवना नदीवर हा तेलाचा तवंग दिसून येत आहे. पाण्यावर तेलाचा तवंग दिसून आल्यानंतर संबंधित विभागाला याची माहिती देण्यात आली. त्यानंतर धरणातील पाणी सोडण्यासाठी सध्या हायड्रोलिक यंत्रांचा वापर केला जात असल्याने पाण्यात तेलाचा तवंग दिसत असल्याचे स्पष्ट केले गेले.
पवना धरणातील (Pawana Dam) पाणी सोडण्यासाठी सध्या हायड्रोलिक यंत्रांचा वापर होतो. त्यामुळे पाणी सोडताना त्या हायड्रोलिक यंत्रे सुरु केल्यानंतर त्यातून पाण्याची गळती होऊन मोठ्या प्रमाणात तेल पाण्यात मिसळत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पाण्यात तेल मिसळले जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हायड्रोलिक यंत्रातून तेल गळती होत असेल तर ती तात्काळ दुरुस्त कराण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे.
पाण्याचा गंभीर प्रश्न
पिंपरी-चिंचवड शहर (Pimpri Chinchwad) आणि मावळ (Maval) तालुक्याची ही लाईफ-लाईन म्हणून ओळखले जाते. पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यामुळे पाण्यात दिसणारा तेलाचा तवंग गंभीर बाब आहे असे मत पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली. पाण्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. त्यातच आता ऐन उन्हाळ्यात ही समस्या निर्माण झाली तर परिसरात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे हायड्रोलिक यंत्रातून तेल गळती होत असेल तर तात्काळ दुरुस्त करुन पाणी समस्या दूर करणे गरजेचे आहे.
एप्रिल मे मध्येच पाणी समस्या
या परिसरातील नागरिकांना असे पाणी मिळाले तर त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे तात्काळ ही समस्या सोडवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. एप्रिल मे महिन्यामध्येच पाण्याची ही समस्या निर्माण झाली आहे. त्या यंत्रातून सातत्याने जर तेलाची गळती होत राहिल तर नागरिकांना पाण्याची चिंता भेडसावणार आहे. सध्या अनेक जिल्ह्यातून पाण्यासाठी भटकंती सुरु आहे. त्यामुळे पाण्याचा हा प्रश्न गांभीर्याने सोडवावा अशी मागणी नागरिकांसह महिलांनी केली आहे.