- अपना वतन संघटनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थायी समिती बरखास्त करावी तसेच आजी माजी स्थायी समिती अध्यक्षांच्या बेहिशोबी मालमतेची चौकशी करावी. तसेच राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी भ्रष्ट स्थायी समिती सदस्यांवर पक्षांतर्गत कारवाई करावी, त्याचबरोबर एसीबीच्या धाडीत रंगेहात पकडले गेलेले स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांचा भाजपने राजीनामा घ्यावा. अशी मागणी अपना वतन संघटनने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत स्थायी समितीवर एसीबीच्या पथकाने टाकलेल्या धाडीनंतर २१ ऑगस्ट २०२१ रोजी अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख यांनी लोकमराठी या फेसबुक पेज च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.
त्यामध्ये बोलताना त्यांनी सांगितले कि, लाच प्रकरणात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपचे स्थायी स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगेसह मुख्य लिपिक ज्ञानेश्वर पिंगळे, लिपिक विजय चावरीया, कॉम्प्युटर ऑपरेटर राजेंद्र शिंदे आणि शिपाई अरविंद कांबळे यांना ताब्यात घेतलं. टेंडर मंजुरीनंतर वर्क ऑर्डर काढण्याकरिता ९ लाखाची ही लाच घेण्यात आली होती, अशी माहिती एसीबीने दिली आहे.
या प्रकरणामुळे स्मार्ट सिटी म्हणून ओळख असलेली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची बदनामी झाली असून स्थायी समितीत होत असलेला भ्रष्टाचार उघडकीस आला आहे . स्थायी समितीमधील इत्तर १६ सदस्यांच्या नावाने हि लाच घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी ,शिवसेना व भाजप पक्ष कुठलाही असो , जनतेच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. जेणेकरून पुढील काळात कोणी भ्रष्टाचार करण्याची हिम्मत करणार नाही.
स्थायी समितीमध्ये घडलेल्या बेकायदेशीर प्रकारामुळे मुंबई महानगरपालिका अधिनियम १९४९ चे उल्लंघन झाल्याने स्थायी समिती बरखास्त करण्यात यावी. तसेच मागील १० वर्षातील सर्व स्थायी समिती अध्यक्षपद उपभोगलेल्या आजी माजी नगरसेवकांच्या बेहिशोबी मालमतेची चौकशी करण्यात यावी. अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयावर आंदोलन
यावेळी बोलताना त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचाही समाचार घेतला. त्यांनी सांगितले कि ना खाऊंगा, ना खाने दूंगा हा नारा देत सत्तेत आलेल्या भाजपने किमान भ्रष्टाचारच्या आरोपात रंगेहात पकडलेल्या स्थायी समिती अध्यक्षांचा राजीनामा घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी. अन्यथा भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड येथील पक्षकार्यालयावर आक्रमक आंदोलन केले जाईल, त्यावेळेस कायदा व सुव्यवस्थेची सर्वस्वी जबाबदार चंद्रकांत पाटील स्वतः राहतील असा इशारा दिला आहे.