अनधिकृत सिगारेट विक्रीसाठी 50 हजारांची लाच मागणारा पोलिस व हस्तक एसीबीच्या ताब्यात


अनधिकृत सिगारेट विक्रीसाठी 50 हजारांची लाच मागणारा पोलिस व हस्तक एसीबीच्या ताब्यात

पुणे : पान टपरीवर अनाधिकृतपणे सिगारेटची विक्री करतो म्हणून कारवाईचा बडगा उगारून पान टपरी चालकाकडे ५० हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली. त्यापैकी २० हजार रूपयाची लाच खासगी इसमामार्फत स्विकारणारा पोलिस कर्मचारी आणि खासगी इसम अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात अडकले आहेत. त्या दोघांना लाच घेतल्यानंतर रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस नाईक संजय भिला वाघ (३८, बक्‍कल नंबर ३७३८, नेमणुक चर्तुःश्रृंगी पोलिस स्टेशन) आणि किरण प्रकाश पाले (रा. जुनी सांगवी, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

तक्रारदाराची परिसरात पानाची टपरी आहे. पान टपरीवर अनाधिकृत सिगारेटची विक्री करतो म्हणुन पोलिस कर्मचारी वाघ हे तक्रारदारास कारवाईची भाषा करीत होते. कारवाई न करण्यासाठी त्यांनी ५० हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली होती. दरम्यान, तक्रारदार यांनी अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार नोंदविली. १० मे रोजी तक्रारीची पडताळणी करण्यात आली. पोलिस नाईक संजय वाघ हे लाचेची मागणी करीत असल्याचे निष्पन्‍न झाले.

अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने शुक्रवार पुणे-मुंबई हायवेवरील हॉटेल यशोदासमोर सापळा रचला. सरकारी पंचासमक्ष खासगी व्यक्‍ती किरण पाले याच्यामार्फत पोलिस नाईक संजय वाघ यांनी तक्रारदाराकडून २० हजार रूपयाची लाच घेतली. त्यानंतर अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने त्यांना अटक केली आहे.

पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, अप्पर अधीक्षक दिलीप बोरस्ते, उपाधिक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. काही दिवसांपुर्वीच वानवडी पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचार्‍याने आणि पोलिस आयुक्‍तालयातील आस्थापना शाखेतील वरिष्ठ लिपिकाने लाच घेतली होती. त्यांना अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडून अटक देखील करण्यात आली. दरम्यान, अ‍ॅन्टी करप्शन विभागाने येरवडा पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचार्‍याला देखील लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. त्या सर्व कारवाया काही दिवसांपुर्वीच झाल्या आहेत. त्यानंतर ही मोठी कारवाई झाल्याने पुणे शहर पोलिस दलात खळबळ उडाली आहे.