काळेवाडी : तापकीर नगरमधील साई मल्हार कॉलनीत महापालिकेच्या वतीने करण्यात आलेले डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या कामाची चौकशी करून संबंधित अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करावी. अशी मागणी केमिस्ट असोसिएशन ॲाफ पुणे डिस्ट्रीक्टचे उपाध्यक्ष व काळेवाडी रहाटणी केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विवेक मल्हारी तापकीर यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.
याबाबत तापकीर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, साई मल्हार कॅालनीमधील डांबरीकरण अनेक वर्षापासून प्रलंबित होते. मात्र, आता महापालिकेच्या वतीने करण्यात आलेले डांबरीकरण फक्त सुशोभिकरणासाठी केले आहे, असे दिसून येत आहे. सदर डांबरीकरण आयुक्तांनी स्वतः जातीने उपस्थित राहत पाहणी करून याचा दर्जा पाहून पुढील कार्यवाही करावी.
तसेच अनेक ठिकाणी पॅचेस आहेत, माल कमी पडला म्हणून मोठी डांबरखडी न हातरता, लहान खडीचे डांबरीकरण केले आहे. अर्धवट रस्ता करून मोठ्या खडीचे निम्मे डांबरीकरण केले आहे. अशा दर्जाहीन कामामुळे महापालिका निधीचा अपव्यय होत असून याप्रकरणी संबंधीतांवर कारवाई होणे गरजेचे आहे.