आरोपींना मारण्याची प्रथा लोकशाहीला घातक

आरोपींना मारण्याची प्रथा लोकशाहीला घातक

अनिल वैद्य

कर्नाटकात चार आरोपींना मारून टाकले तर अनेक लोकं फार खुश झाले आहेत कारण लोक बलात्काराच्या घटनेमुळे फार संतप्त होते. पण ते हे विसरतात की, आपल्या लोकशाही देशात Rule of the Law कायद्याचे राज्य हे तत्व आहे. या पद्धतीने जर आरोपीचा पोलीस खात्मा करू लागले तर धनदांडगे पैशाच्या जोरावर व जात दांडगे जातीच्या जोरावर विरोधकांना सहजा सहजी शासकीय गोळी घालून सरकारी खून करतील.

पाहिले बळी असतील ते गरीब, बहुजन, ओबीसी, अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्याक लोक ज्यांच्याकडे पैसा नाही, सत्ता नाही असे लोक. आरोपी करणे व गोळ्या घालून मारून टाकणे असेच करायचे असेल तर कशाला न्याय व्यवस्था संविधानात निर्माण केली.? हा सुध्दा प्रश्न नागरिकांनी स्वतःला विचारला पाहिजे.

कसाबला जो देशद्रोही होता त्याला सुद्धा खटला चालवून फाशी दिली. हिंसेचा ज्यांचा इतिहास आहे, खून करणे, मारा मारी करणे, बदला घेणे, युद्धखोर अशी ज्यांची संस्कृती आहे त्यांना हा प्रकार आवडेल, यात काही शंका नाही. खऱ्या खोटयाचा निकष पोलीस लावत असतील तर व स्वतःच फाशी देत असंतील तर या देशात हुकूमशाही यायला वेळ लागणार नाही. बहुसंख्य समाज हा न्याय तत्वापासून अनभिज्ञ आहे पण जबाबदार नागरिकांनी तरी आसुरी आनंद सोडून कायद्याच्या बाजूला उभे राहणे गरजेचे आहे. ही या देशाच्या भविष्यासाठी गरज आहे. तातडीने निर्णय लागावे म्हणून दुसरे उपाय आहेत ना!

जलद तपास करा, जलद दोषारोपपत्र दाखल करा व जलद खटला चालवा. आरोपीला शिक्षा द्या. तपास करणे कामी मात्र निष्काळजी पणा केला जातो. वर्षोनुवर्षे तपस करतात? फॉरेन्सिक अहवाल वर्षोनुवर्षे पोलिसांना मिळत नाहीत. यात सरकारने सुधारणा करावी. सरकारी वकिलांनी तातडीने खटला चालवून घ्यावा बघू या न्यायालयात जलद न्याय मिळतो की नाही. आरोपिचे मुडदे पाडणे हे उद्यासाठी घातक ठरेल.