आदिवासी समाज, परंपरा व वाटचाल

आदिवासी समाज, परंपरा व वाटचाल

प्रा. डॉ. किरण मोहिते

सिंधू संस्कृतीच्या उत्खनातील आदिवासींचा उल्लेख आर्याच्या भारतातील आगनापूर्वी या देशात प्रगत संस्कृती असलेल्या लोकांचे अस्तित्व होते या लोकांना द्राविडीयन लोक म्हणतात. हे लोक म्हणजे नागपूजक होते. भारतात सिंधूच्या सुपीक खोऱ्यात हडप्पा आणि मोंहजोदडो हे दोन शहर अस्तित्वात होते. हडप्पा व मोंहजोदडो येथील उत्खनन प्राचीन संस्कृतीस ‘हरप्पा संस्कृती’ किंवा ‘नागर संस्कृती’ असे म्हणतात. ही आदिवासीची मूळ संस्कृती आहे. म्हणून हिला मूळ निवासीयांची संस्कृती असे म्हणतात. प्राचीन इतिहासकारांनी तिला सिंधू संस्कृती असे नाव दिले. हे द्राविडीयन लोक आजच्या भटक्या, शुद्र दलित आदिवासींचे पूर्वज आहेत. म्हणूनच सिंधू संस्कृतीला मूळ निवासी यांची संस्कृती किंवा द्रविडीयन संस्कृती म्हटले जाते.

सिंधू संस्कृतीत धाडसी, शूर आर्याचे भारतात आगमन झाले. आर्यानी लोकांच्या संपत्ती काबीज केल्या. भारतात आपली लोकवस्ती निर्माण केली. धान्ये, शेतजमिनी, गायी, जलाशये काबीज केली नगराची तटबंदीची शहरे जाळली. कत्तली केल्या व आपली सत्ता हस्तगत केली आर्यानी इ.स. पूर्व ३१०२ मध्ये ब्रम्हावतीची स्थापना केली.

सिंधू संस्कृतीच्या उत्खनातील पुराव्यावरून असे सिद्ध होते की भारतीय मूळ निवासी यांचा नागवंशीयांचा तेथील तटबंदीय शहरे, लोकांचे व्यवसाय, छंद, लोकजीवन, त्यांच्यावरील जुलूम आर्याच्या आगमनानंतर झाला असे म्हणता येईल.

आजचे आदिवासी हे द्राविडीयन लोकांचे मूळ वशंज आहेत. कारण आर्यानी तेथील लोकांच्या कत्तली करून आगी लावून संप्पती बळकावल्या कारण आर्यच त्यांचे शत्रू होते यातून काही लोक जीवाच्या आकांताने रानावनात जीव वाचविण्यासाठी पळाले व काही बचावले पुढे हेच लोक आज आदिवासी म्हणून नावारूपाला आले.

आर्याचे भारतातील आगमन खैबरखिंडीतून झालेले असून ते येथील मूळ निवासी नसून परकीय आहेत कारण हडप्पा व मोंहजोदडो येथील उत्खननात तसे पुरावे आढळून आले नाहीत. यात आर्याची मृत शरीर अथवा आर्य संस्कृतीच्या पाऊलखुणा आढळून आल्या नाहीत. द्राविडीयन लोक हेच मोहजोंदडोतील लोक होते हे उत्खननातून सिद्ध झाले आहे.

मेडिटरेनिअन मानववंशाचे तीन पोट विभाग आहेत.

१. मोहेंजोदडोतील लोकांचा अंगबांधा मध्यम प्रकारचा, रंग काळा, केस कुरळे असतात हा प्रकार दक्षिण भारतात कन्नड, केरळ, तामिळ विभागात आढळतो तसेच पूर्ण विदर्भात भामरागड सिरोंचा व आंध्रप्रदेशात आढळतो.

२. खराखुरा मेडिटरेनिअन प्रकार या पहिल्या प्रकारापेक्षा रंग जास्त उजळ व बांधा जास्त उंच असतो हा प्रकार पंजाब व गंगेच्या मैदानात आढळतो.

३. पौर्वात्य म्हटला जाणारा प्रकारात बांधा उंच, रंग गोरा आणि नाक लांब असतो हा प्रकार पंजाब सिंधमध्ये आढळतो. या तीन मध्ये महत्वाचे साम्य आहे ते म्हणजे लांबट डोके हे होय.

वरील उल्लेखित माणसे महाराष्ट्रात भंडारा, गडचिरोली व चंद्रपूर या जिल्हयात तर छत्तीसगड राज्यातील जंगल परिसरात आढळून येतात. गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने अेटापल्ली, अहेरी, भामरागड, धानोरा या तालुक्यात आदिवासी लोक आढळून येतात यांचे वर्णन बसक्या नाकाचे, कुरळ्या केसाचे, काळ्या वर्णाचे आहेत यावरून या लोकांचे पूर्वज सिंधू घाटीच्या आक्रमणात जीवाच्या भीतीने या भागात आश्रयास आले असावेत असे वाटते.

सिंधू संस्कृतीचा काळ इ.स.पूर्व ३००० ते १८५० पर्यंत मानला आहे. हडप्पा आणि मोहंजोदडों येथे उदयास आलेली संस्कृती आर्यपूर्व काळातील लोकांची संस्कृती होती. सिंधू संस्कृती ही आर्यापूर्वीची संस्कृती असून आर्यानी तिचा नाश घडवून आणला. ऋग्वेदातील वर्णनानुसार आर्यांनी उंच भितीच्या शहरातील लोकांना पळवून लावले. हडप्पा व मोहंजोदडोतील उत्खननात रस्त्यावर व घरात मानवी हाडांचे अवशेष मिळाले. ऋग्वेदात मनु हा आर्याचा राजा असून त्यांने इंद्राच्या मदतीने अनार्थाचा म्हणजे दास्याचा पाडाव केला असे वण्रन आहे. सप्तसिंधू प्रदेशातून 6 नद्या (सिंधू झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज, सरस्वती) वाहत असाव्यात यावरून या प्रातांस सप्तसिंधू नाव संबोधन असावेत यामध्ये काश्मीर, वायव्य, प्रांत पंजाब, सिंधू, राजस्थान व अफगाणिस्तान हे देश होते. भारतातील आर्याच्या आगमनाबाबतची सखोल माहिती ऋग्वेदात मिळते म्हणून यांस ऋग्वेद काळ म्हणतात.

भारतीय आदिवास समाज

भारतातील मूळ निवासी आदिवासी लोक असून रानावनात राहणारे असल्यामुळे त्यांना ‘गिरीजन’ तसेच ‘अरण्यक’ असेही म्हणण्यात येते. आर्याचे हिंदुस्थानात आगमन झाल्यावर काही आदिवासी लोक हे जीवाच्या भीतीने रानावनात दऱ्या-खोऱ्यात आश्रयास पळाले. आदिवासी लोक हे समूहप्रिय होते ते टोळ्या करून समूहाने राहत होते. काही आदिवासी टोळ्यांनी आर्याशी समायोजन करून त्यांच्यात मिसळून जाणे पसंद केले.

भारतात इंग्रजांच्या सत्ता कारभारानंरत ख्रिस्ती धर्मोपदेशक, धर्म सुधारक यांचे पेव फुटले. या मिशन भारताच्या विभिन्न्‍ा भागात फिरू लागल्या. या मिशन यांनी धर्मप्रसार, धर्मसुधारणा, याबरोबर मानवतेच्या दृष्टीकोनातून शिरगणती करणारे अधिकारी व सरकारी अधिकाऱ्यांच्या तुकड्या विविध कारणास्तव आदिवासी जास्त भागात फिरू लागल्या. अशा वेळी आदिवासीची वर्गवारी कोणत्या धर्मात करावी असा प्रश्न त्यांना पडला कारण त्यांना हिंदू धर्मीय म्हणवून घेण्यासाठी आवश्यक चातुर्वण्‌य समाजपद्धती त्यांनी अंगीकारली नव्हती. हिंदुधर्माचार, शुद्धाशुद्ध, कर्मकांड, पापपुण्य कल्पनाशी ते निगडीत नव्हते. त्यांचे सांस्कृतिक व धार्मिक जीवन हिंदूपेक्षा पूर्णपणे भिन्न होते म्हणून त्यांची गणना सुरूवातीला ‘प्राणीपूजक’ म्हणून केली नंतर हिंदूधर्मातील समाजपद्धती चालीरीती, इत्यादीशी समरस झाले पर्यायाने त्यांचे हिंदुकरण होऊन हिंदू धर्म व आदिवासी टोळ्या यातील अंतर कमी होऊन त्यांना अनुक्रमे वन्य जमाती. ‘पहाडी टोळ्या’ तर ‘मागासलेले हिंदू’ असे संबोधले जाऊ लागले.

सन १७८२ व १८१९ साली राजमहल टेकड्यावरील वन्य जमातीच्या प्रदेश ओरीसातील कोहान विभागासाठी ‘सामान्य कायद्याच्या कक्षेतून वाढलेल्या भागाचे नियम’ असा कायदा करावा लागला तर महाराष्ट्रात भिल्ल, महादेव कोळी, जमातीच्या १९ व्या शकताच्या उत्तरार्धात केलेल्या बंडाचा उल्लेख आढळतो यावरून जिथे आदिवासीचे अस्तित्व धोक्यात आहे असे आढळून येते.

स्वातंत्र्यपूर्व काळात ख्रिस्ती मिशनऱ्यांनी व धर्म प्रसारकांनी आदिवासी प्रदेशात मोठ्या प्रमाणात कार्य केले. आदिवासींच्या मानवतेच्या दृष्टीकोनातून मदत केली त्यांचे ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करण्‌यास सुरूवात झाली. दवाखाने, शिक्षण सुविधासाठी शिक्षण संस्था काढल्या. नामदार गोखल्यांनी १९०५ साली ‘भारत सेवक समाज’ स्थापन केला. संपूर्ण देशभर आदिवासी सेवेचा पाया घातला. तर ठक्करबाप्पा यांनी दोहद येथे १९१२ मध्ये भिल्ल सेवा मंडळाची स्थापना केली.

जगातील आदिवासी समाज :

जगात सर्वत्र आदिवासी अधिवास आहे. त्यांतल्या त्यात लॅटीन अमेरिका, आशिया हे खंड आदिवासी भाग आहेत. जगातील १९९१ च्या जनगणनेनुसार जगाच्या एकूण लोकसंख्येच्या ४% एवढी आदिवासी लोकसंख्या होती. ग्रीनलॅड संयुक्त संस्थाने (आलास्का) आणि रशिया देशात इनुईट (एक्सियो) ही जमात आढळून येते. फुलाणी आदिवासी जमात आफ्रिकेतील आठ देशात विस्तारली आहे. इंडोनेशियातील पापुआ आदिवासी न्युगांनी देशात मिझी व लुभाई जमाती भारतात व म्यानमार देशात वास्तव्य करतात.

१) पिग्मी (Pigmi) :- पिग्मी लोक मध्य अफ्रिकेतील युगांडापासून ते आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यापर्यंत राहतात. तसेच या प्रदेशातून इवुरी नदी वाहत असून त्याच्या बाजूला हे पिग्मी लोक राहत असल्याने त्यांना इवुरी पिग्मी म्हणतात. पिग्मीचा प्रमुख गट बेल्जियम कांगोच्या घनदाट जंगल असलेल्या भागात राहतो. उष्ण कटिबंधीय आफ्रिकेत राहणारे पिग्मीचे गट पूर्व भागातील मध्यभागातील व पश्चिम भागातील अशा विविध गटात विभागले आहेत.

२) बुशमेन (Bushmen) :- बुशमेन आदिवासी जमातीचा अधिवास दक्षिण आफ्रिकेतील कल्हारी वाळवंटात आढळतो. शेतीच्या व्यवसाय करणाऱ्या निग्रोनी त्यांच्या प्रदेशावर अतिक्रमण केले. यांचे वास्तव्य कल्हारी वाळवंटात आढळते. काही शतकापूर्वी बसुटो लॅट, नेटल, दक्षिण होडेशिया पूर्व टागनिका व पूर्व अफ्रिकेतील उंच पठारावर हे लोक आढळतात.

३) सेमांग (Semang) :- निग्रिरोवंशीय लोकांचे सेमांग लोकांशी साम्य असलेले दिसून येते. थायलंड, मलेशिया यातील पर्वतीस प्रदेश आणि विषुवृत्तीय प्रदेशातील दक्षिण संयाम येथे सेमांग या आदिवासी जमाती आढळून येतात. सेमांग हे जगातील आदिम असून जंगलातील कंदमुळे, फळे इ. गोळा करणे हा प्रमुख व्यवसाय आहे.

४) सकाई/सोनाई (Sokai/Sonai) :- सकाई लोक मलायातील रहिवाशी असून त्यांचे निवासी क्षेत्र सेमांग जमातीच्या दक्षिणेस आहे. या भागात नद्या, मैदाने हा घनदाट जंगलाचा प्रदेश आहे व तेथेच त्यांची वस्ती आहे. सफाई हे आदिम जमातीतील लोक असून शिकार व कंदमुळे गोळा करणे व फळे गोळा करण्याचे काम ते करतात. सकाई लोकांचे मुख्य खाद्य म्हणजे मासं होय व आजूबाजूच्या राहणाऱ्या शेतकऱ्यापासून मिळणारे खाद्य होय. सकाई मलायातील घनदाट अरण्यात राहत असल्याने शिकार हा त्यांच प्रमुख व्यवसाय आहे.

५) मध्य आशियातील किरणीझ :- पामीर पठाराच्या उंच भागात किरणीझ लोकांच्या पारंपरिक प्रदेश आहे. तिएनशानं भागातील रशियन लोक किरणीस लोकांना कारा किरगिझ असे संबोधतात. पामिरचे पठार व तिएन शान प्रदेशाचे किरणीस रहिवासी आहेत. रशियन कझाक व किरणीझ यांची जीवनपद्धती सारखीच आहे.

थोडक्यात जगात सर्वत्र वन्य जातीचे वैविध्य आढळून येते. आदिवासी समाजाच्या इतिहासाचा आढावा घेताना जागतिक इतिहास, भारतीय इतिहास, सिंधू संस्कृतीच्या उत्खननातील आदिवासीचा उल्लेख केलेला आहे. या वन्य जमाती विषयी काही ठिकाणी चांगला उल्लेख देखील पहावयास मिळतो. भारतातील मूळ निवासी म्हणजे आदिवासी होय. त्यांना प्रामुख्याने भूमीजन, आदिम, भूमीन टोळ्या प्रिमिटीव्ह या नावाने देखील संबोधले जाते.

आदिवासी समाज, परंपरा व वाटचाल
प्रा. डॉ. किरण मोहिते, महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी, पुणे-१७

संदर्भसूची

  1. हुसेन मज्जिद मराठी अनुवाद भागवत, ए. व्ही., डॉ. सप्तर्षि, प्रविण नलावडे संजीव, सौ. नलावडे इरावती, नातू मुकुंद, मानवी भूगोल, के. सागर पब्लिकेशन, पुणे, मार्च 2002, पृ. 437
  2. घारपुरे विठ्ठल, मानवी भूगोल, पिंपळपुरे ॲन्ड क. पब्लिशर्स, नागपूर, 2000, पुणे, पृ.107-115
  3. गारे गोंविद, (1975) भारतीय आदिवासी समाज आणि संस्कृती, अमृत प्रकाशन, औरंगाबाद, पृ.1-2
  4. देशमुख प्र. रा., सिंधू संस्कृती, ऋग्वेद व हिंदू संस्कृती, पृ.1
  5. गोकुळदास मेश्राम, (2006), आदिवासी सिंधू संस्कृतीचे वारसदार व त्यांचा धन्य, सुगावा प्रकाशन, पृ. 56
  6. घारपुरे विठ्ठल, मानवी भूगोल, पिंपळपुरे ॲन्ड क. पब्लिशर्स, नागपूर, 2000, पुणे, पृ.107-115
  7. तत्रैव, प़- 116-119