
- पालकमंत्री हसन मुश्रीफ करणार ऊर्जामंत्र्यांशी चर्चा
अहमदनगर : जिल्ह्यात बिबट्यांच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आणि त्यांनी मानवी वस्तीत येऊन हल्ले करण्याच्या प्रकार वाढल्याची दखल पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली असून बिबट्यांना पकडण्यासाठी अधिक पिंजरे प्राप्त करुन घेण्यासंदर्भात पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर, बिबट्याच्या भीतीमुळे शेतकऱ्यांना रात्री शेतात जाणे टाळण्यासाठी शेतीला दिवसा वीज उपलब्ध करुन देण्यासंदर्भात राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आज पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांवर आढावा बैठक घेतली. त्यावेळी कोरोना प्रादुर्भाव व संभाव्य दुसरी लाट, अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने झालेले नुकसान व मदतवाटप, जिल्ह्यात बिबट्याचा मानवी वस्तीत वाढलेला वावर आणि त्यावरील उपाययोजना, कृषी योजना आदींचा त्यांनी तपशीलवार आढावा घेतला. जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके, महानगरपालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, मनपा आरोग्य अधिकारी अनिल बोरगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप आदी यावेळी उपस्थित होते. त्यानंतर श्री. मुश्रीफ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, गेल्या काही दिवसात जिल्ह्यात बिबट्याचा वावर वाढला असून पाथर्डी तालुक्यात त्याने तीन जणांचे बळी घेतले. वनविभागाने बिबट्यांना पकडण्यासाठी पावले उचलली आहेत. जिल्ह्यासाठी अधिक पिंजरे मिळावेत, यासाठी राज्य स्तरावर निश्चितपणे प्रयत्न करु. नागरिकांनीही बाहेर पडताना, शेतात जाताना काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. शेतकर्यांना रात्री शेताला पाणी देण्यासाठी जावे लागते. त्यामुळे शेतीसाठी रात्री ऐवजी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करुन देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. त्यासंदर्भात श्री. मुश्रीफ यांनी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले.