Crime News : रेखा जरे हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार निघाला दैनिकाचा संपादक

Crime News : रेखा जरे हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार निघाला दैनिकाचा संपादक

अहमदनगर : राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या रेखा जरे हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार एका आघाडीच्या दैनिकाचा संपादक बाळ ज. बोठे असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्वत: पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

नगरमधील यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांची गत ३० नोव्हेंबर रोजी रात्री नगर- पुणे महामार्गावर जातेगाव घाट परिसरात हत्या झाली आहे. या हत्याकांडात पोलिसांनी आतापर्यंत फिरोज राजू शेख, ज्ञानेश्वर शिंदे, आदित्य चोळके, सागर उत्तम भिंगारदिवे, ऋषिकेश ऊर्फ टप्या वसंत पवार या पाच आरोपींना अटक केली आहे. हे सर्व आरोपी नगर जिल्ह्यातील आहेत. या आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार या हत्येची सुपारी ही बोठे व सागर भिंगारदिवे यांनी दिल्याचे पोलीस तपासात समोर आले असल्याचे अधीक्षकांनी सांगितले. बोठे याच्या शोधासाठी पाच पथके रवाना करण्यात आली आहेत. जरे यांची हत्या का करण्यात आली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. बोठे याच्या अटकेनंतर हत्याकांडाचे कारण समोर येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. बोठे सध्या फरार आहे.

आरोपींपैकी फिरोज व ज्ञानेश्वर या दोघांनी दुचाकी आडवी लावून जरे यांची कार अडवली व गळा चिरून त्यांची हत्या केली. चोळके याने या दोघांना ही सुपारी दिली होती, तर चोळके याला बोठे व भिंगारदिवे यांनी सुपारी दिल्याचे तपासात पुढे आले आहे. पोलिसांनी भिंगारदिवे याच्याकडून ६ लाख २० हजार रुपये जप्त केले आहेत.