स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अवमानाच्या विरोधात ठाण्यात हिंदुत्वनिष्ठांचे निषेध आंदोलन

  • सावरकरांचा अवमान करणाऱ्या पुस्तकावर देशभरात तत्काळ बंदी घालावी,
  • अन् संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई करावी
  • समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अवमानाच्या विरोधात ठाण्यात हिंदुत्वनिष्ठांचे निषेध आंदोलन

ठाणे : भोपाळ येथे काँग्रेस सेवादलाच्या प्रशिक्षण शिबिरात ‘वीर सावरकर कितने ‘वीर ?’ या नावाने वाटण्यात आलेल्या पुस्तकामध्ये अत्यंत हीनकस, स्वा. सावरकरद्वेषी आणि धादांत खोटारडे लिखाण केले आहे. यातून काँग्रेसवाले स्वातंत्र्यवीरांना बदनाम करण्यासाठी किती खालच्या पातळीला जाऊ शकतात, हेच दिसून येते. स्वा. सावरकर यांचाच नव्हे, तर कोणत्याही राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक यांचा अवमान कोणाकडूनही होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने तत्काळ यासंदर्भात कायदा करण्याची आवश्यकता आहे. काँग्रेसने वाटलेल्या पुस्तकातून देशात धार्मिक आणि जातीय तणाव निर्माण करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचाही कुटील हेतू दिसून येतो. काँग्रेसचा स्वा. सावरकरद्वेष, हा संपूर्ण क्रांतीकारी चळवळीविषयीचाच द्वेष असून या आक्षेपार्ह पुस्तकावर देशभरात तत्काळ बंदी घालावी, त्याच्या लेखक अन् प्रकाशक यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे अजय संभूस यांनी केली.

१० जानेवारी रोजी ठाणे (प.) रेल्वेस्थानकाच्या बाहेर सॅटिस पुलाखाली विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या करण्यात आलेल्या अवमानाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. या वेळी संभूस बोलत होते.

‘आम्ही सारे सावरकर’ असे लिहिलेले पोस्टर असलेले फलक परिधान करून राष्ट्रप्रेमी या आंदोलनात सहभागी झाले होते. या वेळी आंदोलनकर्त्यांनी भारतमाता की जय, वन्दे मातरम् अशा घोषणा देत क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांचा अवमान करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या आंदोलनात विविध संघटनांच्या प्रतिनिधींसह अनेक सावरकरप्रेमी उपस्थित होते.

काँग्रेसची शिबिरे म्हणजे सामाजिक सलोखा बिघडवण्याचे प्रशिक्षण देणारी केंद्रेच! काँग्रेसच्या शिबिरांमध्ये देशातील क्रांतीकारक हे समलिंगी संबंध ठेवणारे, मशिदींवर दगडफेक करणारे, तसेच अल्पसंख्यांकांच्या महिलांवर बलात्कार करणारे होते, असे सांगणारे अत्यंत गलिच्छ पुस्तक वाटून काय शिकवले जाते? यातून काँग्रेसी शिबिरे ही सामाजिक सलोखा कसा बिघडवता येईल, याची प्रशिक्षण केंद्रे आहेत, हेच सिद्ध होते. स्वा. सावरकरांसारख्या महान राष्ट्रभक्ताची अवहेलना सार्वजनिकरित्या आणि सातत्याने होत आहे. कोणीही उठतो आणि त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतो, हे अक्षम्य आणि असहनीय आहे. वारंवार घडणार्‍या अशा घटनांतून राष्ट्रभक्त नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत शासनाने पाहू नये. दोषींवर कठोरात कठोर आणि तत्काळ कारवाई करावी, तसेच आजवर झालेला स्वा. सावरकरांचा अपमान भरून काढण्याचा एक प्रयत्न म्हणून स्वा. सावकरांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार तत्काळ घोषित करावा, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.