70 वर्षीय आजीबाई इमोव्हा गाडीतून विकतात भाजी

70 वर्षीय आजीबाई इमोव्हा गाडीतून विकतात भाजी

पुणे-हिंजवडी : वयाच्या साठीनंतर अनेकजण आराम करण्याचा विचार करत असतात. मात्र, याला अपवाद आहेत माण गावातील सुमन निवृत्ती भरणे. या 70 वर्षीय आजीबाई चक्क न्यू ब्रॅण्ड इनोव्हामधून ताजा भाजीपाला विकताहेत. दिवसभरात यातून त्यांची कमाई तब्बल आठ हजारांची असते.

हिंजवडी नजीकच्या माण गावात भरणे कुटुंबीयांची 15 एकर शेती आहे. भरणे आजी या वयातही संपूर्ण ताकदीने आजही शेतात राबतात. विविध प्रकारचा भाजीपाला, कडधान्ये, गहू, बाजरी, ज्वारी पिकवली जाते. आजीचा रोजचा दिवस पहाटे ठीक साडेपाच वाजता सुरू होतो. सहा वाजेपर्यंत त्या शेतात असतात आणि सगळा भाजीपाला काढून आणतात. त्यांच्या जुड्या बांधणे, कडधान्यांचे पॅकिंग केल्यावर इनोव्हामध्ये “लोड’ केला जातो. सोबत त्यांचा मुलगा असतो. सकाळी 9 वाजेपर्यंत कधी सांगवीमध्ये; तर कधी हिंजवडी आयटी पार्क; तर कधी बाणेर, पाषाणमध्ये त्या भाजी विकतात.

दिवसाला सुमारे तीन ते दहा हजार रुपयांची कमाई होत असल्याचे त्यांनी सांगितले. कारमध्ये बसून भाजी विकताना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान असते. याबाबत त्यांचा मुलगा संदीप म्हणाला, “यंदा कांदा महागल्याने त्यातून पैसे चांगले मिळाले. दिवाळीला फॉर्च्युनर गाडी घेणार आहे. तीन चाकी गाडीवरून सुरू झालेला प्रवास हा आज एका 25 लाखांच्या कारपर्यंत येऊन पोचला आहे.” त्यांचे 15 जणांचे एकत्रित कुटुंब आहे.