मध्यप्रदेश शासनातर्फे इंदोरमध्ये शुद्ध मराठी अभिव्यक्ती कार्यशाळा उत्साहात

मध्यप्रदेश शासनातर्फे इंदोरमध्ये शुद्ध मराठी अभिव्यक्ती कार्यशाळा उत्साहात

लोकमराठी न्यूज नेटवर्क

इंदोर : मध्यप्रदेश शासनाच्या मराठी साहित्य अकादमी आणि मुक्त संवाद साहित्यिक समिती, इंदोर यांच्या संयुक्त विद्यमाने

रविवारी (ता. १४ नोव्हेंबर) इंदोर येथे मराठी भाषकांसमोर ‘शुद्ध मराठी अभिव्यक्ती’ या विषयावर कार्यशाळा झाली. या कार्यशाळेत सहभागी मराठी भाषकांना मार्गदर्शन करण्यासाठी पुण्याहून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह, अक्षरभारतीचे अध्यक्ष व पुण्यातील मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे उपाध्यक्ष माधव राजगुरू यांना पाचारण करण्यात आले होते.

महाराष्ट्रापासून दूर अमराठी प्रांतात जिथे हिंदी भाषेचा प्रभाव आहे, अशा वातावरणात राहणाऱ्या मराठी भाषकांचा प्रतिसाद आणि प्रतिक्रिया पाहून ही कार्यशाळा त्यांच्यासाठी एकप्रकारची पर्वणीच होती, असे जाणवले. गेली अनेक वर्षे म्हणजे जवळजवळ ११ वर्षे मुक्त संवादच्या माध्यमातून मराठी बांधवांसाठी अशा प्रकारचे उपक्रम तेथे सुरू आहेत. हे उपक्रम तेथे राहणाऱ्या मराठी भाषकांची महाराष्ट्र आणि मराठी भाषेशी असलेली नाळ आणि त्यांचे नाते अधिक घट्ट करण्याबरोबरच मराठी भाषा आणि संस्कृतीचेही संवर्धन करत आहेत. शुद्ध मराठी अभिव्यक्तीच्या संदर्भात संपन्न झालेली कार्यशाळा हा तर अभिनव आणि स्तुत्य असा उपक्रम होता.

मध्यप्रदेश शासनातर्फे इंदोरमध्ये शुद्ध मराठी अभिव्यक्ती कार्यशाळा उत्साहात

मराठी अकादमीचे निदेशक उदय परांजपे आणि मुक्त संवादचे मोहन रेडगावकर यांच्यामुळे हे शक्य झाले. त्यामुळे त्यांचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा मी मनापासून आभारी आहे. या कार्यशाळेत मी लिहिलेली आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे द्वारा प्रकाशित सुगम मराठी शुद्धलेखन या पुस्तिकेचे पुनर्मुद्रण करून त्याच्या प्रती निःशुल्क वाटण्यात आल्या. पुढील काळात मध्यप्रदेशातील मराठी भाषकांना अशा अनेक कार्यशाळा घेऊन पुस्तिकेच्या ५००० प्रती वाटण्यात येणार आहेत, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या आणि मराठीसाठी काही करण्याची इच्छा असणाऱ्या लोकांसाठी ही गोष्ट निश्चितच प्रेरणादायी आहे. या निमित्ताने तेथील मराठी भाषकांना भेटून, त्यांच्याशी संवाद साधून मला मनस्वी आनंद झाला. असे माधव राजगुरू यांनी सांगितले.