कोरोनाला हरविण्याची संकल्प गुढी

कोरोनाला हरविण्याची संकल्प गुढी

पिंपरी : गुढीपाडवा…सुख, समृद्धी आणि मांगल्याचा सण…हिंदू नववर्षाची सुरुवात अन् साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला सण… मात्र, या सणावर कोरोनाचे गडद सावट असल्याने घरच्या घरी थांबून ‘कोरोना’ला हरविण्याच्या संकल्पाची गुढी अनेकांनी उभारली. यंदा या मुहूर्तावर नव्या वस्तूंची खरेदीही करता न आल्याने पाडव्याचा गोडवा हरवला.

गुढीपाडव्याला लागणारे विविध साहित्य यंदा बाजारात दाखल झाले नाही. कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी गर्दीची ठिकाणे बंद केल्यानंतर ग्रामीण भागातील नागरिक शहरात फिरकलेच नाहीत. शहरात गुढी उभारण्यासाठी बांबूही उपलब्ध झाला नाही. यंदा कोरोनामुळे उलाढाल ठप्प झाली. काही ग्राहकांनी चार दिवसापूर्वी धार्मिक विधीसाठी लागणार्‍या किरकोळ साहित्याची खरेदी केली. मात्र प्रत्येक दिवसाला कोरोनाची छाया गडद होत असल्याने खरेदीचा मुहूर्त साधता आला नाही.

बाजारपेठ आणि वाहतूक पूर्णत: बंद असल्याने सोने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहने, कपडे, मिठाई आदी दुकानांसह सध्या विविध बाजारपेठा ओस पडलेल्या दिसल्या. घरोघरी, कार्यालयांमध्ये गुढी उभारून तिला गोड नैवैद्य दाखविला जातो. सायंकाळी सूर्यास्तापूर्वी गुढी उतरविली जाते. या दिवशी घरोघरी जात आप्तेष्टांना नववर्षाचे अभीष्टचिंतन केले जाते. मात्र, कोरोनामुळे अनेकांनी सोशल मीडियाद्वारे एकमेकांना शुभेच्छा दिल्या. ऐन सणासुदीच्या काळात “लॉक डाऊन”मुळे शुकशुकाट होता. अत्यावश्यक कामांसाठीच लोक घराबाहेर पडत असल्याने सणाची लगबग कोठेही पाहायला मिळत नाही. मराठी नववर्षारंभानिमित्त दरवर्षी निघणाऱ्या शोभायात्रा यंदा कोरोनामुळे निघाल्याच नाही.

पूजेच्या साहित्याची दुकाने बंद
गुढी उभारण्यासाठी बांबूची काठी, रेशमी वस्त्र अथवा साडी, कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, फुलांचा हार, साखरेची गाठी, तांब्याचा गडू, रांगोळी, हळदी-कुंकू, अगरबत्ती, कापूर, निरांजन अशा पूजेच्या साहित्याची दुकाने बंद असल्याने खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ दिसली नाही. फुल बाजारही बंद होता.

मोशीत निरुत्साहात पाडवा साजरा
मोशी : निरुत्साही वातावरणात नागरिकांनी चक्क तोंडावर मास्क चढवूनच गुढी उभारून तिची पूजा केली. मोशीतील विनायक नगरमधील. मोशी गावठाणासह, विनायक नगर, आल्हाट वाडी, सस्ते वाडी, बोऱ्हाडे वाडी, बनकर वाडी, कुदळे वस्ती आदी वाड्यावस्त्यांवरील घराघरांत गुढ्या उभारल्या. शेती भाग असलेल्या या परिसरामध्ये चैत्र महीना व वसंत ऋतूमध्ये सर्वत्र वृक्षांना हिरवीगार पालवी फुटली होती. मात्र तरीही प्रसन्न वाटण्याऐवजी कोरोनाचे सावट सर्वत्र असल्याने नागरीकांमध्ये उत्साह नव्हता. मोशी प्राधिकरणातील सर्व पेठा, देहू आळंदी बीआरटी रस्त्यावरील गगनचुंबी इमारतींमधील सदनिकांच्या गच्चीमध्येही गुढ्या उभारल्या. मात्र मराठी नववर्षची परंपरा खंडीत होऊ द्यायची नाही म्हणून कोरोना दूर व्हावा अशी सदिच्छा गृहिणी रुपाली आल्हाट यांनी व्यक्त केली.

कोरोनाच्या भीतीचे सावट असतानाही भोसरी परिसरात गुढीपाडवा गुढी उभारून उत्साहाने साजरा करण्यात आला. गुढीपाडव्यामुळे पीएमटी चौकात साखरेच्या घाट्या, लिंबांच्या फांद्या, हार व बांबू घेण्यासाठी सकाळी नागरिकांनी गर्दी केली होती. नागरिकांनी आपल्या घरावर गुढ्या उभारल्या आणि कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे घरीच राहणे पसंत केले. त्यामुळे दुपारी एक नंतर भोसरी परिसरात शांतता व रस्त्यावर शुकशुकाट होता.

जुनी सांगवी परिसरात गुढीपाडव्याची औपचारिकताच
जुनी सांगवी : कोरोनाच्या संकटामुळे गुढीपाडवा मराठी नववर्षाचे जुनी सांगवीकरांनी गुढी उभारून स्वागत केले.मात्र नेहमीचा उत्साह नव्हता.सरकारी सुचनांचे पालन करत अनेकांनी घराबाहेर न पडता घरातील उपलब्ध साहित्य घेवून गुढी उभारून पुजा केली.लिंबाची डहाळी,बत्ताशा या गोष्टींना फाटा देत कलश,नवी साडी कपडालावून गुळ साखर तांदळाच्या अक्षता वाहून समाधान मानले. लिंबाची डहाळी एरव्ही बाजारात उपलब्ध व्हायची गुढीसाठी जणू ती आवश्यक बाब मात्र बहुतांश ठिकाणी लिंबाच्या डहाळी दिसली नाही. मास्क लावून कुटुंबियांमध्येही पुरेसे अंतर राखत अनेकांनी गुढी उभारली. मंदिर बंद असल्याने भाविकांनी घरातच पूजाअर्चा केली.