संविधान दिनाच्या दिवशी हा फोटो बघा..

संविधान दिनाच्या दिवशी हा फोटो बघा..

हेरंब कुलकर्णी

आज संविधान दिन. भारतीय संविधानात लोक सर्वोच्च स्थानी आहेत असे मानणारा हा दिवस. पण हा फोटो भारतीय लोकशाही दिनी सर्वोच्च स्थानी कोण आहे? हे सांगायला पुरेसा आहे. सर्व महाराष्ट्रात वेगवेगळ्या आंदोलनात कार्यकर्ते जेव्हा निवेदन देतात तेव्हा ते निवेदन स्वीकारताना अधिकारी उभे सुद्धा राहत नाहीत हेच चित्र असते.

उभे राहून सामाजिक कार्यकर्त्यांनी विषयी आदर व्यक्त करावा असे त्यांना वाटत नाही. वास्तविक या फोटोत निवेदन देणारे कालिदास आपेट हे एका शेतकरी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष आहेत व त्यांच्यासोबत काम करणारे शेतकरी किमान 30 वर्षापेक्षा जास्त काळ रस्त्यावर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संघर्ष करणारे आहेत. समाजासाठी काम करणारी ही माणसे स्वतःचा वेळ आणि पैसा खर्च करून तुमच्या कार्यालयात येतात स्वतःसाठी काही न मागता जनतेच्या प्रश्नावर तुमच्याशी बोलतात तेव्हा ते निवेदन स्वीकारताना उभे राहून किमान सन्मान दाखवावा असे यांना वाटत नाही.

लोकशाहीत लोकांच्या भावनाप्रती आदर व्यक्त करावा असे या अधिकाऱ्यांना का वाटत नसेल? यातून दिसणारा उद्दामपणा अत्यंत संतापजनक आहे. लोकशाहीत सर्वोच्च स्थानी कोण आहे हे सांगायला पुरेसे आहे. आपण मात्र ही लोकशाही लोकांसाठी आहे व लोक सर्वोच्च आहे अशी भाबडी समजूत करून घेऊया